पेशेंट रेफर करू नका, शिस्तीत काम करा, डॉक्टर, कर्मचार्यांना झापले
बीड (रिपोर्टर) शिस्तप्रिय आणि धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी सुपरिचीत असलेले सनदी अधिकारी, आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे दिवाळीनिमित्त जिल्ह्यात डेरेदाखल आहेत. गावाकडील दौर्यावर मुंढेंनी शासकीय रुग्णालयांना भेटी देऊन आढावा घेण्यास सुरुवात केली. काल सायंकाळच्या दरम्यान अचानक त्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्याने डॉक्टर-कर्मचार्यांची एकच धांदल उडाली. आयुक्त मुंढेंनी स्वत: रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी कुठे औषधाचा तुटवडा, कुठे रेकॉर्ड मेन्टेन नाही तर कुठे डॉक्टरांना रुग्णालयात काय चालू आहे हेच माहित नाही. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांसह कामात कुचराई करणार्या, रेकॉर्ड व्यवस्थीत न ठेवणार्या कर्मचार्यांना झापझाप झापले. सरकार तुम्हाला पगार देतय, काम व्यवस्थीत करा, आता कामात कुचराई जमणार नाही, असे तुकाराम मुंढेंनी म्हटले. (पान ७ वर)
शिस्तप्रिय आणि धडाकेबाज निर्णय घेण्यात राज्यभरात सुपरिचीत असलेले आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेताच डॉक्टर, कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच रात्री अचानक तपासणी करण्यासाठी राज्यभरात एकाच वेळी सूचना केल्या तेव्हा बीडमध्ये चर्हाटा, नाळवंडी येथील वरिष्ठ अधिकार्यांनी तपासणी केली होती. त्यावेळी डॉक्टर गैरहजर दिसून आले होते. त्यावेळी मुंढेंनी ऑनलाईन बैठक घेऊन रुग्णसेवा सुधारण्याबाबत सूचना केल्या होत्या. आता भर दिवाली तुकाराम मुंढे जिल्ह्यात डेरेदाखल आहेत. त्यांचे जन्मगाव असलेल्या ताडसोन्ना येथे दिवाळी दौर्यावर ते आले होते. काल तीन वाजेपर्यंत गावाकडे अनेकांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर सायंकाळच्या दरम्यान त्यांनी थेट बीड जिल्हा रुग्णालय गाठले. आयुक्त मुंढे रुग्णालयात येताच उपस्थित डॉक्टर, कर्मचार्यांची एकच धांदल उडाली. मुंढेंनी स्वत:हून रुग्णालयात राऊंड घेतला. तब्बल दोन ते अडीच तासांच्या राऊंडमध्ये त्यांनी बारीकसारीक गोष्टी तपासल्या. कुठे औषधाचा तुटवडा, कुठे रेकॉर्ड मेंटेन नसल्याचे दिसून आले. शासनाच्या पगारा घेताय, आता कामात कुचराई चालणार नाही. व्यवस्थीत रुग्णसेवा द्या, असे म्हणत डॉक्टर, कर्मचार्यांना त्यांनी झापले. वेगवेगळ्या वॉर्डात जावून त्यांनी रुग्णांची विचारपूस केली. डॉक्टरांना सिझरबाबत आणि रुग्ण रेफरबाबतही विचारणा केली. तेव्हा आलेले उत्तर हे असमाधानकारक असल्याने आपल्याकडे सर्व सुविधा असताना रुग्णांना रेफर का केलं जातं? जिथली तिथे उपचार करा, सर्व साहित्य आहे, सर्व सेवा आहेत, मग रेफर करून चालणार नाही, असेही ते या वेळी म्हणाले.
अन् मुंढेंनी बाळाचे वजन केले
रुग्णालयामध्ये पाहणी करत असताना आयुक्त तुकाराम मुंढे हे प्रसुती वार्डात गेले. त्याठिकाणी एका बाळाचे वजन केले. रेकॉर्ड मागीतले. त्यावरचं वजन आणि प्रत्यक्षात असलेल्या वजनामध्ये तफावत होती तेव्हा वजन कोणी केले? महिलेची डिलेव्हरी कोणी केली? असे प्रश्न विचारत कामात हलगर्जीपणा आणि कुचराई चालणार नसल्याचे सांगितले. आयुक्त मुंढे बाळाचं वजन करतील हे उपस्थित कर्मचारी, डॉक्टरांना स्वप्नातही वाटले नसेल.