परळी (रिपोर्टर) परळी येथील रवींद्र गायकवाड या सुरक्षा रक्षकाची कन्या श्रद्धा गायकवाड हिचा परळीकरांनी सर्वपक्षीय नागरी सत्कार आयोजित केला होता. अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या स्केट बोर्डिंग स्पर्धेत 36 व्या नॅशनल गेम्स मध्ये सुवर्ण कमाई करणारी श्रद्धा आता फ्रान्स मध्ये 2024 साली होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे, तिचा परळीकरांनी आयोजित केलेला गौरव सोहळा अत्यंत खास ठरला आहे.
परळीतील या सर्वपक्षीय गौरव समारंभास अर्थातच दिग्गज नेते धनंजय व पंकजा मुंडे हे दोघेही उपस्थित होते, त्यामुळे इथे राजकीय टोलेबाजी होईल असे सर्वांना अपेक्षित होते, मात्र त्याऐवजी इथे वेगळीच सौहार्दपूर्ण टोलेबाजी अनुभवावयास मिळाली! त्या टोलेबाजी पेक्षा अधिक चर्चा एका वेगळ्याच गोष्टीची नेटकरी करताना दिसत आहेत, श्रद्धा गायकवाड ही आपल्या सत्काराला उत्तर देत असताना अत्यंत आत्मविश्वासाने आपले मनोगत मांडत होती, पण तिच्या हातातील वायरलेस माईक अचानक बंद पडला, तो माईक बंद पडल्याचे लक्षात येताच धनंजय मुंडे हे स्वतः उठून सिस्टीम मॅनेजर कडे जातात व नवीन माईक आणून श्रद्धाच्या हाती देतात, धनंजय मुंडे यांच्या या कृतीचीच चर्चा अधिक रंगली होती. सभागृहात देखील यावेळी जोरदार टाळ्यांचा कडकडाट पहावयास मिळाला. परस्पर राजकीय विरोधक असणारे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आणि तेही परळीत म्हटल्यावर राजकीय टोलेबाजी होणार असे
अपेक्षित होते, मात्र परळीतील एका लहान मुलीचा तिच्या कर्तृत्वाबद्दल होत असलेला सत्कार पाहत, धनंजय मुंडे व पंकजाताई यांनी राजकीय परिपक्वता दाखवत एकमेकांवर टीका करणे टाळत श्रद्धाला प्रोत्साहन दिले. प्रथम बोलताना पंकजाताई आपल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण कडून श्रद्धाला आगामी तयारीसाठी ब्लँक चेक देत असुन त्यावर गरजेनुसार हवी ती रक्कम श्रद्धाने भरावी असे म्हणाल्या. तर धनंजय मुंडे यांनी माझ्या बहिणीने ब्लँक चेक दिला आहे, तो बाऊन्स होऊ नये यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या त्या अकाउंट वर मी हवे तेवढे पैसे भरतो, असे म्हणत उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे, धनंजय तुम्ही त्या अकाउंटवर पैसे भरा, असे मोठ्या आस्थेने पंकजाताई म्हणाल्या. या सत्कार सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांसह प्रशासकीय सेवा, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.