मुंबई (रिपोर्टर) मुंबई : ठाकरे-आंबेडकर घराण्याचा तीन पिढ्यांपासूनच्या नात्याचा वारसा सांगत सेना-वंचितचे आगामी काळात एकत्र येण्याचे संकेत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा डाव टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर येत्या 20 तारखेला एकाच मंचावर येणार आहेत. या कार्यक्रमातून युतीच्या चर्चा पुढे जाण्याआधीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी ही भेट होणार असल्याची माहिती कळतीये. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा आणि कार्यक्रमाच्या रुपरेषेसंदर्भात मुख्यमंत्री आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यात चर्चा होणार असल्याची प्राथमिक माहिती कळते आहे. परंतु उभयतांमध्ये या भेटीत ठाकरे-आंबेडकर संभाव्य युतीचीही होऊ शकते.
पत्रकार, समाजसुधारक आणि फर्डे वक्ते केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या 20 नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी मंदिरमध्ये ’प्रबोधन डॉट कॉम’ या संकेतस्थळाचं लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार आहेत. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वंचित-शिवसेना युतीच्या चर्चांनी जोर धरलाय. वंचितने तर शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिल्याचीही चर्चा आहे. अशा वेळी दोघे नेते एका व्यासपीठावर येत असल्याने संभाव्य युतीवर काही बोलणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत असल्याने दोघांमध्ये काय विचारमंथन होणार, याकडे राजकीय वर्तुळासह महाराष्ट्राचे डोळे लागलेत.