हत्यारा रोहीदास नेकनूर पोलिसांच्या जिवावर उठला
पोलिस गाडीला अपघात; अपघातानंतर जखमी पोलिसांवर आरोपीचा हल्ला, बहाद्दर पोलिसांनी रोहीदासच्या मुसक्या बांधल्या
सहायक पोलीस निरीक्षक जखमी
चार पोलिसांसह दोन सरकारी पंच किरकोळ जखमी
चौसाळ्या जवळील खळबळजनक घटना,
पंचनाम्यासाठी मुळुकवाडीच्या आरोपीला पोलीस घेऊन जात होते
अमजद पठाण। नेकनूर
मुळुकवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी नेकनूर पोलीस आपल्या गाडीमध्ये घेऊन जात असताना मधल्या सीटवर बसलेल्या आरोपीने अचानकपणे जीप चालकाला पाठीमागून मिठी मारली. त्यामुळे जीप चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला त्याक्षणी जीपने तीन ते चार पलटी खाल्ल्याने झालेल्या या अपघातात सपोनि. मुस्तफा शेख हे जखमी झाले तर गाडीमध्ये असलेले चालकासह दोन पंच व आरोपी यात किरकोळ जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर तशा अवस्थेत पोलिसांनी धाडसाने आरोपीला आपल्या ताब्यात ठेवले. सदरच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून जखमी मुस्तफा शेख यांना लोटस् हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुळुकवाडी येथे वृद्ध दाम्पत्यावर कोयत्याने वार करत एकाची हत्या करणार्या रोहीदास विठ्ठल निर्मळ या आरोपीस काल न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तपासासाठी त्याला पोलीस कोठडी मिळाली होती. म्हणून आज सकाळी नेकनूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख, दोन सरकारी पंच सय्यद फरेज अली, संजय काळे (ग्रामपंचायत कर्मचारी), पोलीस जीप चालक देशमुख, पो.कॉ. मुरुमकर, पो.कॉ. खाडे, पो.कॉ. राख हे सर्व आरोपी रोहीदास निर्मळ याला घेऊन घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी मुळुकवाडीकडे निघाले असता चौसाळ्यापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या खंडाळा फाट्याजवळील जाधववाडी जवळ अचानक मधल्या सीटवर बसलेल्या आरोपी निर्मळ याने अचानक पोलीस जीप चालकाला पाठीमागून मिठी माली. स्टेअरींग पकडले. जीप वेगात असल्याने चालकाचा जीपवरील ताबा सुटला आणि जीपने दोन ते तीन पलट्या खाल्ल्या. या अपघातात सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागला तर जीपमधील अन्य कर्मचार्यांसह आरोपीला किरकोळ मार लागला. अपघात घडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र मोठ्या शिताफीने पोलीस कर्मचार्यांनी आरोपी रोहिदास निर्मळ यास पकडून ठेवले. अपघात घडल्यानंतर जखमी अवस्थेत सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी अगोदर आरोपीला सुरक्षितस्थळी हलवले त्यानंतर शेख यांना उपचारासाठी बीडच्या लोटस् हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेने नेकनूर परिसरात खळबळ उडाली आहे.
अपघातातल्या पोलिसांवर
आरोपीचा हल्ला
पोलिसांची जीप पलटी झाल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या पोलिसांना खुनाचा गुन्हा असलेल्या आरोपी रोहिदास निर्मळ याने तशा अवस्थेत पोलिसांवर हल्ला चढवला. त्यांना लाथा बुक्क्याने मारत असल्याचे काहींनी सांगीतले. परंतु तशा अवस्थेत बहाद्दर पोलिसांनी आरोपी रोहिदास निर्मळच्या मुसक्या बांधल्या.