गणेश सावंत
मो. नं. 9422742810
राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आणि त्या निकालातून निवडून आलेले चेहरे पाहितल्यानंतर अपेक्षेची मोट बांधायला हरकत नाही. ज्या गावकीच्या निवडणुकांकडे तरुणांचं दुर्लक्ष असायचं, केवळ गावचा मालदार, वतनदार, सावकार एवढाच निवडणुकीच्या रिंगणात उतरायचा. साम-दाम-दंडाच्या भूमिकेत निवडणूक जिंकायचा. आता मात्र साम-दाम-दंडाच्या भूमिकेत तरुणही उतरलेला दिसला. परंतु त्या मालदार-वतनदार, सावकाराच्या निर्ढावलेल्या पणापेक्षा तरुणांचे राजकारणाते प्रवेश आणि त्यांचे स्वप्न ग्रामोन्नतीचे सध्या तरी दिसले. बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात प्रस्थापितांबरोबर विस्थापितांचाही दणदणीत विजय झाला. प्रस्थापितांकडे ग्रामोन्नतीच्या अपेक्षेने पाहणे हे मुर्खपणाचेच परंतु विस्थापीत असलेल्या तरुणांना ज्या गावांनी निवडून दिले. त्या गावातल्या नागरिकांनी त्यांच्याकडे ग्रामोन्नतीच्या अपेक्षेने पाहितले तर ते गैर ठरणार नाही. कारण आता हाच तरुण खरच जर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक असेल तर तो नक्कीच ग्रामोन्नतीकडे आणि गावच्या प्रश्नाकडे खास करून लक्ष देईल, परंतु केवळ सत्ताकारणाचे गणित जुळवणार्या जिल्हा, तालुका पातळीवरील राजकारण्यांनी अशा तरुणांचा दुरुपयोग करून घेण्यास सुरुवात केली तर मग मात्र त्या ग्रामोन्नतीचं तर सोडा निवडून आलेल्या त्या नवख्या राजकारण्याची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. खरं पाहिलं तर कालच्या निवडणुकीमध्ये
पैसा हा चिंतेचा विषय
ठरला. जिल्ह्यातल्या कुठल्याही गावच्या निवडणुकींबाबत विचारण्यात आले असता त्या गावची माहिती घेतली असता, प्रस्थापीत विरुद्ध विस्थापीत ही जशी थेट लढाई सांगितली जात होती. त्या लढाईमधले प्रमुख अस्त्र हे पैसा दाखवण्यात येत होते. ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसे आहेत, जो शेवटच्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्णायक मतांची खरेदी करू शकतो तोच निवडणूक रिंगणात आपला विजय खेचून आणू शकतो. अनेक ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निकालानंतर ही वस्तूस्थिती समोरही आली. मात्र काही ग्रामपंचायत निवडणुका लागलेले निकाल हे ग्रामोन्नतीच्या दृष्टीने विस्थापीत तरुणांना न्याय देणारे ठरले. परंतु असे किती विस्थापीत तरुण ग्रामपंचायतींच्या खुर्चीपर्यंत गेले, किती विस्थापीत तरुणांना त्या त्या गावच्या तरुणांनी स्वीकारलं, किती पॅनलप्रमुखांनी लाखाच्या आत खर्च करून ग्रामपंचायत आणली? हा शोधाचा विषय राहील. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीसाठी किती लोकांनी एकर-दोन एकर विकलं, सावकाराकडून कर्ज काढलं, उसनवारी केली. याचा आकडा गावागावात आणि शिवार शिवारावर आपल्याला ऐकायला भेटेल. विषय एवढाच, ग्रामपंचायतीसाठी जर पन्नास लाख अन् कोटींची भाषा केली जात असेल, वस्तूस्थितीनुसार तेवढा खर्च होत असे आणि तेवढा खर्च करून कोणी निवडून येत असेल, तर त्या सरपंचाकडे ग्राम उन्नतीची अपेक्षा कशी करणार? आज मतदार जर पैसा घेतो तर तो पैसा काढण्यासाठी सरपंच भ्रष्टाचार करतोच. हे उघड सत्य नाकारता येणार नाही. आता या विषयाकडे पैसा कमविण्याचे साधन म्हणून पाहण्यापेक्षा
सर्वास पोटास लावणे आहे
हा मूलमंत्र अंगी बांधून सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. हे स्वराज्य निर्माण करताना इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि पातशाह्यांना अंगावर घेत, झुंजवत स्वराज्यातील जनतेला स्वातंत्र्याच्या श्वासाबरोबर स्वाभिमानाने जगण्याचं साधन दिलं. पारतंत्र्यात उपाशीपोटी आणि स्वाभिमान गहान ठेवून रयतेला दिवस काढावे लागायचे, मात्र तिथेच स्वाभिमानाचा सुर्य उगवला. रयतेच्या मनगटात आत्मविश्वास निर्माण झाला. त्या आत्मविश्वासातून रयतेने शेत कसले, सुखाचे आणि सुगीचे पीक त्या आत्मविश्वास आणि स्वाभिमानाच्या बळातून त्यांनी काढले ते केवळ नेतृत्व करणारा हा नि:स्वार्थी राजा होता. स्वाभिमान, अभिमान, रयतेबाबतचं प्रेम त्या राजाच्या तना-मनामध्ये होतं. म्हणूनच कधी शेतकर्याच्या भाजीच्या देठालाही हात लावण्याची मुभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साध्या सैन्याला नव्हती. गावागावांमध्ये दिनदुबळ्यांना पीकपेर्यापासून बैल-बारदाण्यापर्यंत माझा राजाच सर्व काही देत होता. त्या राजाच्या राज्यामध्ये आज ग्रामाचे काय हाल आहे? गावगावची स्थिती काय आहे? याचा विचार गावगावच्या प्रत्येक तरुणासह निवडून आलेल्या प्रस्थापीत आणि विस्थापीत सरपंचाने केला तर नक्कीच त्या गावच्या विकासाला हातभार लागेल. महाराजांसारखे सर्वास पोटास लावणे आहे हा मुलमंत्र नाही घेतला तरी चालेल, परंतु महाराजांचा विचार आणि राजकारणामधून समाजकारणाची दिशा देणारे संकेत जरी आत्मसात केले तरी त्या गावच्या विकासाला हातभार लागल्याशिवाय राहणार नाही. आज बीड जिल्ह्यात आणि राज्यामध्ये निवडणुकीच्या निकालांमधून
तरुणाईची रग
दिसून आली. तरुणांचा राजकारणाकडे पाहिला जाणारा दृष्टीकोन बदलल्याचे यातून दिसून येते. तरुणाई ही मोठ्या प्रमाणावर राजकारणामध्ये येत आहे. काही तरुण या राजकारणाला करिअर संबोधत आहेत. काही कमाईचे साधन मानत आहे तर काही टाईट इस्तरीत फाईट मारण्याच्या इराद्यात पहावयास मिळत आहेत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा प्रत्येकासारखाच असेल, हे सांगणे कठीण, परंतु तरुणाईची हीच रग सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांच्या अंगा-अंगात भिणली आणि निवडून आलेल्या सरपंचाने या रगेचा उपयोग गावच्या विकासासाठी, गावच्या प्रबोधनासाठी, गावच्या उन्नतीसाठी केला तर नक्कीच ‘सर्वास पोटास लावणे आहे’ हा शिवरायांचा मूलमंत्र जपला जात आहे असे म्हणायला कोणीही मागे-पुढे पाहणार नाही.
गावचा विकास म्हणजे काय?
14 वा वित्त आयोग आणि 15 व्या वित्त आयोगाच्या पैशांवर डोळा ठेवणे, गावासाठी आलेलं काम 15 टक्के 20 टक्क्याने कोणाला तरी विकणे आणि त्या कमिशनवर आपलं घर चालवणे, आठवडी बाजारात जमा झालेल्या पैशातून घरचा बाजार करणे, गावच्या छोट्या मोठ्या टपर्यावाल्याकडून मिळालेल्या किरायाच्या पैशातून घर चालवणे की पाच वर्षे गाव आपल्या मालकीचे आहे, आपले कोणीच काही करू शकत नाही या तोर्यात हातात गजरा बांधून मदिरेच्या धुंदीत राहणे, आम्ही जेवढे प्रश्न उपस्थित केले हे सर्व आरोप प्रत्येक सरपंचावर केव्हा ना केव्हा होतात, केले जातात त्यात बरच काही सत्य असतं. परंतु आम्हाला वाटतं, आता गावचा विकास म्हणजे काय ? याचं उत्तर देताना नवनिर्वाचीत सरपंचांनी रस्ते, नाली आणि पाणी याच्याही पुढे जात गावच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टीकोनातून शासनाच्या प्रत्येक योजना या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती झाल्या पाहिजे. त्यासाठी कार्यशाळा घेणे, कृषी विभागाच्या शेतकर्यांसाठी असलेल्या योजना, अनुदानित योजना या प्रत्येक शेतकर्यांना माहिती देत त्या योजनांमध्ये त्या शेतकर्यांचा सहभाग करून घेणे, त्यासाठी दोन-तीन महिन्याला तालुका कृषी अधिकार्याच्या उपस्थितीत गावागावात मेळावा घेणे, गावच्या ग्रामपंचायतीला विधान भवनाचे स्वरुप कसे प्राप्त होईल याकडे लक्ष देण्यासाठी आरोग्य, शिक्षण, यांच्या अधिकार्यांना गावात बोलावून गावच्या लोकांना मार्गदर्शन करणे यासह भ्रष्टाचारविरहीत ग्रामपंचायत चालवून गावचा विकास करणे. म्हणूनच नवनिर्वाचीत तरुण सरपंचांनो, गावागावांना जागवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा’