श्रीक्षेत्र गहिनीनाथगड (रिपोर्टर)- नाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी गडावर आलो, आजपर्यंत निवृत्तीनाथ, एकनाथ यांच्यासह सर्व नाथांचे आशीर्वाद मिळाले. राजकारणात गोपीनाथ यांचा आशीर्वाद मिळाल्याचे सांगत संत वामनभाऊंचाच हा महिमा आहे, मला तिकडे डाऊलला जायचं होतं मात्र मुख्यमंत्री तिकडे गेले आणि मला इथे येण्याची संधी मिळाली. मुंबईहून येत असताना हेलिकॉप्टरमधून अरबी
सागर पहायला मिळाला आणि गडावर भक्तांचा सागर दिसून आला. नाथ, वारकरी संप्रदायाचे मूळ येथेच असल्याचे सांगत देव-देश-धर्म वारकरी संप्रदायामुळेच वाचल्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते श्रीसंत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत गहिनीनाथ गड येथील कार्यक्रमामध्ये बोलत होते. या वेळी गडाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, आ. लक्ष्मण पवार, साहेबराव दरेकर, भाजपाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र मस्के, अक्षय मुंदडा, कुंडलिक खांडे, माजी आ. भीमराव धोंडे, आ. मोनिका राजळे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर होते. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज यांनी माझ्या हातात हा जो ध्वज दिला आहे तो नुसता ध्वज नसून सेवा करण्याची जबाबदारी दिली आहे. गडाचा सेवाकरी म्हणून आपण जबाबदारी स्वीकारत असल्याचे फडणवीसांनी म्हटले. गहिनीनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी गडावर आलो आहे, आजपर्यंत सर्व नाथांचे आशीर्वाद मला मिळालेले आहेत. राजकारणात गोपीनाथांचा आशीर्वाद मिळाल्याचे त्यांनी या वेळी आवार्जून सांगितले. विठ्ठल महाराजांचे आभार मानताना फडणवीस म्हणाले की, ईश्वर ज्या ठिकाणी बोलवतो, त्या ठिकाणी जाता येतं. खरं तर मला आज डाओलला जायचे होते मात्र मुख्यमंत्री तिकडे गेले, मला इथे थांबता आले. मुंबईवरून गडावर येताना हेलिकॉप्टरमधून अरबी सागर पहायला मिळाला आणि जेव्हा गडावर उतरताना भक्तीचा सागर पहायला मिळाला. नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचे मूळ याच ठिकाणी असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले. निवृत्ती नाथांपासून संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांपर्यंत ही परंपरा चालू आहे. देव-देश आणि धर्म वारकरी संप्रदायामुळेच वाचल्याचे देवेंद्र फडणवीसांनी या वेळी म्हटले. गडाचा विकास करण्याची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राज्यातल्या विकास कामांबाबत भाष्य केले. आपले मराठवाड्यावरही खास लक्ष असल्याचे त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले. मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी संपुर्ण प्रकल्पाचे टेंडर पुन्हा काढू, असं म्हणत मराठवाड्याला कायमचे दुष्काळातून मुक्त करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. या सर्व भगिरथी प्रयत्नांनी आशीर्वाद द्या, असे म्हणत यापुढे गडाने केलेला आदेश आपल्यासाठी शिरसावंद्य असल्याचे फडणवीसांनी म्हटले.