Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाअजित कुंभार, रामास्वामी जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून, ऑक्सिजन, रेमडिसीवीरसह आरोग्य व्यवस्थेचा आढावा...

अजित कुंभार, रामास्वामी जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून, ऑक्सिजन, रेमडिसीवीरसह आरोग्य व्यवस्थेचा आढावा चालू


नातेवाईकांच्या गर्दीला ब्रेक लावण्यासाठी गंभीर रुग्णांजवळ एक नातेवाईक,रुग्णाजवळ जाण्यासाठी यापुढे घ्यावे लागणार पास, ऑक्सिजन तुटवड्याचा सिलसिला सुरुच, रुग्णालयातील काही रुग्णांना दोन तास नव्हते ऑक्सिजन
बीड (रिपोर्टर)- रेमडिसीवीर, ऑक्सिजनच्या तुटवड्याला तोंड देत जिल्हा प्रशासनासह आरोग्य व्यवस्था कोरोनाशी दोन हात करत असताना बीड जिल्हा रुग्णालयात बाधित रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर गर्दी करून असतात. ऑक्सिजनचे सिलेंडरही ताब्यात घेतात आणि आरोग्य कर्मचारीही रुग्णांकडे दुर्लक्ष करतात. अशा एक ना अनेक तक्रारी आल्यानंतर आज जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांनी कोविड रुग्णालयात दोन ते तीन तासांचा राऊंड घेऊन आरोग्य व्यवस्थेचे व्यवस्थापन केले. त्याचबरोबर यापुढे अतिगंभीर रुग्णाजवळ केवळ एक नातेवाईक तोही पास घेऊन जाऊ शकतो. अशी नियमावली बनवत आरोग्याची घडी व्यवस्थीत बसवण्यासाठी अजित कुंभार त्या ठिकाणी तळ ठोकून बसले आहेत.
   बीड जिल्ह्यामध्ये रेमडिसीवीरसह ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने रुग्णांसह रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये कोविड वॉर्ड असताना नातेवाईक मोठ्या प्रमाणात येत असल्याने तेथे जत्रेचे स्वरुप निर्माण झाले आहे. आरोग्य व्यवस्थेसह रुग्णांच्या नातेवाईकांबाबत अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्यानंतर आज सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक रामास्वामी यांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले आणि पाहणी केली. त्यावेळी जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. रात्री काही रुग्णांच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन सिलेंडर ताब्यात घेतल्याच्याही तक्रारी होत्या. या सर्व गोष्टींमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडू नये म्हणून एसपी आणि सीईओ यांनी तीन ते चार तासांचा राऊंड घेऊन जिल्हा रुग्णलयात नातेवाईकांसाठी नियमावली बनवली. अतिगंभीर रुग्णाजवळ केवळ एक नातेवाईक यापुढे राहू शकतो. तोही पास धारक असणार आहे. अन्य नातेवाईकांना आतमध्ये प्रवेश बंद असणार आहे.

खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा
खासगी रुग्णालयाला ज्या एजन्सीज् ऑक्सिजन देत आहेत त्या एजन्सींवर प्रशासनातले अधिकारी जाऊन बसल्याने आणि खासगीर रुग्णालयाला केवळ पाच सिलेंडर ऑक्सिजन द्यावे, असे प्रशासनाचे आदेश असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा होत आहे. रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्ण इतरत्र हलवण्याबाबत सांगत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.

सकाळी काही काळ जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन बंद
जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेणार्‍या परंतु दोन-तीन लिटरवर ऑक्सिजन असणार्‍या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. जेव्हा हा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वत:हून सिलेंडर आपल्या रुग्णापर्यंत नेल्याचे सांगण्यात आले.

आपल्याकडे ऑक्सिजन उपलब्ध;
उद्या पुन्हा एक टँकर येणार -अजित कुंभार

बीड जिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन उद्या संध्याकाळपर्यंत पुरेल एवढे असल्याचे सांगून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुभार यांनी उद्या संध्याकाळपर्यंत आणखी एक ऑक्सिजन टँकर येणार असल्याचे म्हटले. आता अतिगंभीर पेशंटजवळ एक नातेवाईक राहणार आहे, त्यासाठी पासची व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.

ऑक्सिजन अभावी महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पांढरवाडी येथील एका रुग्ण महिलेचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ऑक्सिजन असताना केवळ ते ऑक्सिजन रुग्ण महिलेला वेळेत लावले नाही त्यामुळे मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या प्रकरणावरून जिल्हा रुग्णालयात काही काळ गोंधळ सुरू होता.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!