पुणे (रिपोर्टर) राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पवार आज पुण्यात बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनेचे आमदार फुटणार ही महिती उद्धव ठाकरेंना दोन, तीन वेळा दिली होती, असे सांगत विधान परिषदेच्या निकालावर बोलताना राज्यात तोडाफोडीचं राजकारण चालत नाही हे निकालावरून दिसून आलेलं आहे. भाजपाची सत्ता केंद्रात आणि राज्यात असूनही त्यांना उमेदवार मिळालेले नाहीत. महाविकास आघाडी इथून पुढच्या काळात अधिक चांगल्या प्रकारे उमेदवार देण्यासाठी आणि सामंजस्य भूमिका सर्वांनी दाखवली तर महाराष्ट्रात उद्याच्या काळात वेगळी परिस्थिती असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिक्षक मतदारांनी तोडाफोडीच्या राजकारणाला महत्व दिलं नसल्याचेही त्यांनी म्हटले.
एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का? या प्रश्नाच्या उत्तरात अजित पवार यांनी पडद्यामागची सर्व कहाणी सांगितली. दोन-तीन वेळेला तशी माहितीही मिळाली होती. पवार साहेबांनीही उद्धवजींना माहिती दिली. मीही त्यांना माहिती दिली होती. शरद पवारांनी तर बैठक देखील घेतली होती. पण उद्धव ठाकरे म्हणायचे की मला माझ्या आमदारांवर विश्वास आहे. ते इतकी टोकाची भूमिका घेणार नाहीत असं त्यांना वाटायचं. पण जो पहिला ग्रूप 15-16 आमदारांचा गेला. त्यानंतर आमदारांना एकजुटीनं सोबत ठेवण्याची गरज होती. तशाप्रकारची गरज त्यावेळी दाखवली गेली नाही. मग मुभा असल्यासारखं तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, ज्यांना थांबायचं आहे त्यांनी इथं थांबा असं वातावरण त्यावेळी पाहायला मिळालं. आता वस्तुस्थिती काय हे त्यापक्षाचेच नेते सांगू शकतील, असं अजित पवार म्हणाले.
नेतृत्त्वानं आपल्या सहकार्यांवर डोळे झाकून जो विश्वास टाकला. त्या विश्वासाला पूर्णपणे तडा देण्याचं काम यानिमित्तानं करण्यात आलं. काहीजण गाफील राहिले असं म्हणायला हरकत नाही, असंही अजित पवार म्हणाले. शिंदे गटानं बंडाचं निशाण फडकावलं त्याच्या सहा महिने आधीच माझ्या कानावर याची कुजबूज आली होती, असंही अजित पवार यांनी सांगितलं. एकदम सुरुवातीला फार सहा महिने आधी. म्हणजे जूनच्या आधीच कुजबूज माझ्या कानावर आली होती. माझी आणि उद्धव ठाकरेंची दररोज कामानिमित्त बैठक व्हायची. त्यावेळी मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं आणि त्यांनी माझ्याही कानावर आलं आहे, मी त्यांना बोलावून त्यांच्याशी बोलून घेतो असं म्हटलं होतं. आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे त्यावर मार्ग काढतो असंही ते म्हणाले होते, असं अजित पवार म्हणाले.