बीड (रिपोर्टर) पारतंत्र्याच्या साखळदंडातून रयतेला स्वातंत्र्याचा श्वास मिळवून देत चार पातशाहींना गाढत स्वराज्य निर्माण करणारे अखंड हिंदुस्तानचा स्वाभीमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त बीडमधील शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आज सकाळी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शिवभक्तांनी 101 जोडप्यांसह कष्टकरी, शेतकरी, वीर पत्नींच्या हस्ते शिवपुजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थावर आज सकाळी शहरासह जिल्हाभरातून आलेल्या शिवभक्तांनी राज्याभिषेक दिन सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभाग नोेंदवला. सोळाव्या शतकात पारतंत्र्याच्या साखळ दंडात जखडलेल्या रयतेला स्वातंत्र्याचा श्वास मिळवून देणारे चार पातशाहींना तलवारीच्या पात्यावर गाढणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 साली रायगडावर राज्याभिषेक सोहळा झाला. रयतेचं राज्य महाराष्ट्रात प्रस्थापित झाले. हा राज्याभिषेक सोहळा आता सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असून आज सकाळी बीडच्या शिवतीर्थावर 101 जोडप्यांसह शेतकरी, कष्टकरी वीरपत्नी यांच्या हस्ते महाराजांचे पुजन करण्यात आले. शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात, आनंदात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात हा कार्यक्रम संपन्न झाला.