बीड (रिपोर्टर) राज्यामध्ये शेतकरी आत्महत्यांसह इतरांच्या आत्महत्येच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. नैराश्य, कर्जबाजारीपणा, नापिकी यासह विविध कारणामुळे लोक मरणाला जवळ करू लागले. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात चौघा जणांनी आत्महत्या केल्या. यात तिघांनी गळफास घेतला तर एकाने विष पिऊन आपलं जीवन संपवलं. या चारही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या चौघांच्या आत्महत्या कुठल्या कारणावरून झाल्या हे मात्र समजू शकले नाही.
आत्महत्या केलेल्या चौघांपैकी तिघे तरुण आहेत.
देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्र राज्यात होतात. दररोज पाचपेक्षा जास्त शेतकरी कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून आत्महत्या करत आहेत. शेतकर्यांसह व्यावसायिक आणि इतर क्षेत्रातील नागरिकही आत्महत्या करू लागले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासात चौघा जणांनी आत्महत्या केल्या. बीड तालुक्यातील उमरद खालसा येथील चंद्रकांत भारत जाधव (वय 28 वर्षे) या तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. सदरील तरुणाने कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. दुसरी आत्महत्येची घटना बीड तालुक्यातीलच मुर्शदपूर या ठिकाणी घडली. येथील परशुराम तुकाराम जगताप (वय 38 वर्षे) याने फाशी घेतली. तिसरी घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही या ठिकाणी घडली. भीमा बाबू काटमोरे याने विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चौथी घटना माजलगाव तालुक्यात घडली. रमेश नागुराव कोंबडे (वय 30 वर्षे) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्य केली. या चारही घटनेप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.