बीड (रिपोर्टर): राज्यभरातील बहुतांशी नगरपालिका, महानगरपालिकांवर प्रशासक असल्याने त्या त्या शहरात सर्वसामान्य नागरिकांना मुलभूत गरजा मिळणे मुश्किल झाले असतानाच बीड शहरात मात्र नगरपालिकेचे मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी शहर स्वच्छतेबरोबर पिण्याचे पाण्याचे नियोजन, बिंदुसरा पात्राची साफसफाई यासह तब्बल साडे सहाशे घरकुलांना मंजुरी देऊन लोकांच्या मुलभूत गरजांसह त्यांच्या हक्काच्य योजना परिपुर्णपणे राबवत असल्याने नीता अंधारे यांच्या कर्तृत्व कर्माचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनात नीता अंधारे या कर्तव्य कठोरतेने झपाट्याने कामाला लागल्या आहेत.
बीड शहरातील सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजांसह त्यांच्या न्याय-हक्काच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत गेल्याने तत्कालीन मुख्याधिकार्यांची बदली झाली. गेल्या एक-दीड महिन्यापुर्वी बीड नगरपालिकेचा चार्ज मुख्याधिकारी म्हणून नीता अंधारे यांनी घेतला. तेव्हापासून अंधारे यांनी शहरात आपल्या कामाची चुणूक दाखवायला सुरुवात केली. सर्वप्रथम शहरातील स्वच्छतेला महत्व देत नियमित नाली आणि नाला सफाई, शहरातले मुख्य रस्त्यांसह बाजारपेठेची साफसफाई काटेकोरपणे सुरू केली. शहरातली पिण्याच्या पाण्याची ओरड पाहता योग्य नियोजन लावत शक्य तेवढ्यापर्यंत पाणीपुरवठा करण्याची नियोजीत आखणी करून पाणीपुरवठा सुरू केला. गेल्या पंधरवाड्यापासून शहरातून गेलेल्या बिंदुसरा नदी पात्राच्या स्वच्छतेची, साफसफाईची मोहीम हाती घेत प्रशासन आणि लोक सहभागाच्या माध्यमातून बिंदुसरा पात्र साफसुफ करून एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून घरकुलाचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. गोरगरीब, सर्वसामान्य बेघर नागरिक घरकुलाचा प्रश्न मिटावा म्हणून बीड नगरपालिकेत येरझर्या घालत होते, मात्र गेल्या काही दिवसात मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी तब्बल साडे सहाशे बेघरांना घर देऊन आपल्या कर्तव्य कर्माची चुणूक शहरवासियांना दाखवून दिली आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनात शहरातील नागरिकांना त्यांच्या मुलभूत गरजा तात्काळ मिळाव्यात, नगरपालिकेचे कुठलेही काम विना अडचण दूर व्हावे, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.