आईच्या आशीर्वादानंतर प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन गोपीनाथ गडावर नतमस्तक होणार
ईटके कॉर्नर ते मोंढा मैदान भव्य रॅली
बीड (रिपोर्टर) प्रचार दौरा असो वा अधिवेशन असो, आठवड्यातला एकतरी दिवस परळीसाठी देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे फर्डे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या चाळीस दिवसांपासून परळी बाहेर आहेत. ते 12 फेब्रुवारीला परळीत डेरेदाखल होत असल्याने मतदारसंघातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली आहे. मुंडे हे हेलिकॉप्टरने गहिनीनाथ गडावर नतमस्तक होतील, दुपारच्या दरम्यान ते परळीत आईंची भेट घेऊन प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेत गोपीनाथ गडावर स्व. मुंडेंच्या समाधीस्थळी नतमस्तक होणार आहेत. त्यानंतर त्यांची ईटके कॉर्नर ते मोंढा मैदान स्वागत रॅली निघणार आहे. मुंडे हे 12 तारखेला परळीत दाखल होत असल्याने सोशल मिडियावर ‘टायगर इज कमबॅक’ च्या पोस्ट झळकू लागल्या आहेत.
जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या परळीसह मतदारसंघापासून माजी मंत्री धनंजय मुंडे हे कधीच दूर राहिले नाहीत. दोन महिन्यांचा प्रचार दौरा असो अथवा महिनाभराचे अधिवेशन असो शनिवार, रविवार ते परळीला येत राहिले. शहरासह मतदारसंघातील लोकांच्या भेटी घेत राहिले. मात्र 3 जानेवारी रोजी धनंजय मुंडेंचा परळीत अपघात झाला, त्यामुळे त्यांना तात्काळ मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 16 दिवस उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते 24 दिवस घरीच विश्रांती घेत राहिले. तब्बल 40 दिवस ते परळीपासून लांब आहेत. त्यांच्या आयुष्यात प्रथमच ते इतके दिवस परळीपासून लांब राहिले. आता ते 12 फेब्रुवारी रोजी परळीत डेरेदाखल होत असून त्यांच्या चाहत्यांनी धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. 12 तारखेला सकाळी मुंडे हेलिकॉप्टरने गहिनीनाथ गडावर दाखल होतील. संत वामनभाऊंच्या समाधीशी नतमस्तक होऊन हेलिकॉपटरनेच ते पुढे परळीला येतील. घरी आईचा आशीर्वाद घेऊन लागोलग ते वैद्यनाथ मंदिरात जाऊन प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेणार आहेत. पुढे ते गोपीनाथ गडावर स्व. मुंडेंच्या समाधीशी नतमस्तक होणार आहेत. या परिसरात या भागातील नागरिकांसोबत संवाद साधल्यानंतर ईटके कॉर्नर ते मोंढा मैदान धनंजय मुंडेंची भव्य स्वागत रॅली निघणार आहे. त्यानंतर ते मोंढा मैदान येथे उपस्थित चाहत्यांना संबोधित करणार आहेत. गेल्या चाळीस दिवसांपासून लांब असलेल्या आपल्या लाडक्या लोकनेत्याची 12 तारखेला भेट होणार असल्याने मुंडेंच्या चाहत्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. सोशल मिडियावर ‘टायगर इज कमबॅक’च्या पोस्ट झळकू लागल्या आहेत.