तीन ट्रॅक्टरसह 7 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त; 3 आरोपी ताब्यात
गेवराई : (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील बोरगाव थडी शिवारात विविध तीन ठिकाणी वाळु तस्करी करणारे तीन ट्रँक्टर ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत एकुण 7 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करुन तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. हि कारवाई शनिवारी सकाळी तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि शंकर वाघमोडे यांच्यासह कर्मचार्यांनी केली. दरम्यान या कारवाईमुळे वाळु माफीयाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
गेवराई तालुक्यातील गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत आहे. तालुक्यातील गोदावरी नदीतून विविध ठिकाणी केनीच्या सहाय्याने वाळू उपसा करुन ती अवैधरित्या टिप्पर, ट्रँक्टरद्वारे वाहतूक केली जाते. दरम्यान शनिवारी तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील बोरगाव थडी याठिकाणी ट्रँक्टरद्वारे वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि शंकर वाघमोडे यांना मिळताच त्यांनी पोलिस उपनिरीक्षक भवर पोलिस कर्मचारी अलगट, बागलाने, खंडागळे यांच्यासह सदरील ठिकाणी धाड टाकली. यावेळी विविध तीन ठिकाणच्या या धाडीत वाळूने भरलेले तीन ट्रँक्टर पकडून प्रत्येकी 2 लाख 55 हजार असा एकुण 7 लाख 65 हजारांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. तसेच या ट्रँक्टरवरील तीन चालकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तलवाडा पोलिसांत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान तलवाडा पोलिस ठाण्यात नव्याने पदभार घेतलेले शंकर वाघमोडे यांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात पंधरा दिवसांत हि दुसरी कारवाई केली असून त्यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असल्याने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.