बीड (रिपोर्टर) चंपावती माध्यमिक शाळेतील सहशिक्षक पांडुरंग काळबा भुतपल्ले (वय 54) यांनी आपल्या राहत्या घरी पहाटे पाच वाजता खिडकीच्या गजाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या ही आर्थिक कर्जबाजारीपणातून केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
चंपावती माध्यमिक शाळेमध्ये इतिहास-भुगोलाचे शिक्षक म्हणून पांडुरंग काळबा भुतपल्ले हे कार्यरत होते. एक विद्यार्थीप्रिय आणि मोकळ्या स्वभावाचे शिक्षक म्हणून भुतपल्ले यांची ओळख होती. त्यांनी अनेक ठिकाणी काही शेतजमीनी आणि प्लॉटची खरेदी केली होती. हे करत असताना काही सावकारांकडून त्यांनी पैसे घेतल्याची चर्चा शाळेत त्यांच्या आत्महत्येनंतर होत होती. भुतपल्ले यांची पत्नीही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शेतजमीन, प्लॉटच्या खरेदी-विक्रीतून कर्जबाजारी झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.