बीड (रिपोर्टर) सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहनेर येथे गावालगत अवैध वाळुचा साठा करून त्याची वाहतूक होत असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी आपले पथक पाठवून त्याठिकाणी धाडी टाकल्या असता मोठ्या प्रमाणात अवैध वाळुचा साठा मिळून आला तर एका पिकअप आणि ट्रॅक्टरद्वारे गोदावरी पात्रातून वाळू उपसा करून त्याची वाहतूक करताना मिळून आले. पोलिसांनी ते जप्त करून सिरसाळा पोलिसांच्या स्वाधीन केले.
सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहनेर येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून त्याची ठिकठिकाणी साठवणूक केल्याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी आपल्या पथकातील बालाजी दराडे, वंजारे, पो.ना. भंडाणे, पो.शि. टुले, बांगर यांनी पोहनेर येथे जाऊन जिल्हा परिषद शाळेच्या पाठिमागे असलेला वाळू साठा ताब्यात घेतला. त्यावेळी पिकअप क्र. एम.एच. 42 बी.4358 चा चालक कृष्णा वैजिनाथ मुजमुले (वय 20 वर्षे, रा. पोहनेर ता. परळी) तसेच नदी पात्रातून वाळू भरताना विना नंबरचे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा चालक ज्ञानेश्वर ऊर्फ भैय्या प्रभाकर देशमुख (वय 26 वर्षे, रा. पोहनेर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच गावातील दलित वस्तीजवळ दर्गाह जवळ जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे स्मशानभूमीजवळ या ठिकाणी वाळुचा मोठा साठा करून ठेवला होता. याबाबत पोलिसांनी महसूलचे तालुका दंडाधिकारी यांच्याशी संपर्क साधून आणि पोहनेर सज्जाचे तलाठी सचीन एरांडे यांना याची माहिती देऊन त्यांच्या समक्ष पंचनामा करून तो वाळुचा साठा जप्त केला. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात पो.हे.कॉ. बी.आर. बांगर यांच्या फिर्यादीवरून वाळु माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.