Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeशेतीशेतीला आधार हवा सर्वंकष विम्याचा

शेतीला आधार हवा सर्वंकष विम्याचा

राज्यातील अनेक भागांत परतीच्या तुफान अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाली आहे. पाऊस अतिप्रमाणात पडल्यामुळे जसे नुकसान होते, तसेच कोरडा काळ बरेच दिवस राहिल्यानेही शेतीला फटका बसतो. विदर्भातील काही भागांत यंदा हे चित्र दिसून आले आहे. यामुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. हे नुकसान नैसर्गिकच आहे; पण त्याची चर्चा होत नाही. तसेच कापणी करून काढून ठेवलेल्या पिकाचेही पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याविषयीही फारसे बोलले जात नाही. गतवर्षीही महाराष्ट्रात अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले होते. मागील काळात मराठवाड्यातील अनेक भागांत खूप मोठी गारपीट झाली होती. अशा संकटांच्या काळात नेहमीच नुकसानभरपाईची जोरदार मागणी होते. सरकारकडून तात्पुरता दिलासा देणारे एखादे पॅकेज जाहीर केले जाते. पण यातून शेतकऱ्‍यांना काहीही मदत मिळत नाही. 

‘नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड’मध्ये कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टर सहा हजार रुपये, ओलिताखालील शेतीला १२ ते १३ हजार रुपये आणि बागायती शेतीसाठी १५-१६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. तसेच त्यासाठी दोन हेक्टरचीच मर्यादा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्‍ंयाकडे पाच हेक्टर, दहा हेक्टर किंवा त्याहून अधिक जमीन असेल आणि त्या सर्व शेतीला पावसाचा फटका बसला असेल, तरीही मदत मिळताना केवळ दोन हेक्टरचीच मिळते. हा शेतकऱ्‍यांवर सरळसरळ अन्याय ठरतो. आज आपण अधिक खर्चाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आलेलो आहोत. शेतीमध्येही बियाण्यांपासून मजुरीपर्यंत सर्व प्रकारचा खर्च वाढलेला आहे. शेतीमध्ये सर्व खर्च पीक घरी येण्याआधी करावा लागतो. अशा वेळी एखादे नैसर्गिक संकट येते तेव्हा हा सर्व पैसा अक्षरशः मातीत जातो. कोरडवाहू शेतीचा विचार केला तर कापसाच्या किंवा सोयाबीनच्या शेतीत प्रति हेक्टर किमान १५ हजार रुपये भांडवल मातीत जाते. अशा परिस्थितीत सहा हजार रुपये आणि तेही दोन हेक्टरपुरतीच नुकसानभरपाई मिळाली तर त्यातून शेतकऱ्‍याला कसा दिलासा मिळेल? शेतीतून मिळणाऱ्‍या उत्पन्नावर शेतकऱ्‍याला संपूर्ण कुटुंब पोसायचे असते. आज शेतीबरोबरच शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च, असे सर्वच खर्च वाढलेले आहेत. त्यासाठी शेतकऱ्‍याने पैसा आणायचा कोठून? नैसर्गिक संकटे वाढत चालल्याने आज शेतात तयार झालेले पीक घरी कधी येईल याची शाश्‍वती नसते. पावसामुळे वा अन्य संकटांमुळे त्याचा दर्जा काय राहील आणि त्याला भाव काय मिळेल याचीही शाश्‍वती नसते. कारण या खराब मालाला हमीभावाप्रमाणे भाव मिळतच नाही. अशावेळी शेतीसाठी सर्वंकष पीकविम्याची गरज आहे.

या पीकविमा योजनेमध्ये सरकारनेच सर्व पिकांचा विमा काढला पाहिजे आणि त्याचा संपूर्ण हप्ताही सरकारनेच भरला पाहिजे. या खर्चासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी ५०-५० टक्के विभागणी करुन घेता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली पीकविमा योजना ही कर्ज घेतलेल्या शेतकऱ्‍यांसाठी सक्तीची होती आणि अन्य शेतकऱ्‍यांसाठी ती ऐच्छिक होती. पण आता ती सर्वांसाठीच ऐच्छिक करून टाकली आहे. त्याऐवजी  सरकारनेच सर्व शेतीचा विमा काढून हप्ता भरणे आवश्यक आहे. या विम्याच्या नुकसानभरपाईच्या निकषांमध्ये अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची व्याख्या असली पाहिजे. ज्याप्रमाणे उंबरठा उत्पन्न जाहीर केले जाते, तसेच अवकाळी पावसामुळे उभे पीक खराब झाले किंवा काही पीक हाताशी आले पण त्याचा दर्जा खराब झाला असेल, तर त्यासाठीच्या नुकसानभरपाईची तरतूद असली पाहिजे. कारण या खराब शेतीमालास बाजारात हमीभावही मिळत नाही. त्यामुळे हमीभाव आणि बाजारात मिळणारा भाव यातील फरकाची रक्कम मिळण्याची तरतूद या विम्यात असली पाहिजे. याखेरीज या कृषी विम्यामध्ये शेतकऱ्‍याला प्रति एकरी खर्चाव्यतिरिक्तच्या आर्थिक मदतीसाठी काही रक्कम मिळण्याची तरतूदही असणे गरजेचे आहे. जीवनविम्यामध्ये विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. कारण तो विमाधारक उत्पन्न मिळवून कुटुंबाचे पालनपोषण करत असतो. तशाच प्रकारे शेतातील पीक हे शेतकऱ्‍याला उत्पन्न मिळवून देते. त्याच्यासाठी तेच प्रमुख असते. पण नैसर्गिक संकटाने तेच नष्ट झाले तर त्यासाठीची भरपाई मिळण्यात गैर काय? अशा प्रकारचा विमा तयार केल्यास शेतकऱ्‍यांना दरवर्षी सरकारकडे मदत मागण्याची गरज भासणार नाही.

गावपातळीवर किंवा ग्रामपंचायतींच्या स्तरावर हा विमा असला पाहिजे. कारण अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्ती एका गावात असतात, तर अगदी त्याशेजारच्या दुसऱ्‍या गावात त्याचा लवलेशही नसतो. ही बाब लक्षात घेऊन विम्याची आखणी केली पाहिजे. शेतकऱ्यांनी विमा कंपनीला आपल्या शेतातील व्हिडिओ पाठवावा, अशी अट या विम्यात नसावी. त्याऐवजी कृषी अधिकाऱ्‍यांना याची जबाबदारी द्यावी. आज शेतीसंबंधातील तपशीलवार माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने सरकारला वापरता येऊ शकते. ड्रोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष स्थितीचे अवलोकन करता येऊ शकते. या सर्वांचा कार्यक्षमपणाने वापर या विम्यासाठी करता येईल. शेतीसाठीच्या या विम्यासाठी हप्ता जास्त येऊ शकतो. पण नॅशनल अ‍ॅग्रिकल्चर क्रॉप इन्शुरन्स कंपनी या सरकारी कंपनीच्या माध्यमातून हा विमा काढता येऊ शकतो. शेती हा खुल्या अस्मानाखालचा व्यवसाय आहे. शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो. मग या अन्नदात्याला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. सरकारी तिजोरीतून शेतकऱ्यांना पैसे द्यायचा मुद्दा उपस्थित झाला की वित्तीय शिस्त, महागाई असे मुद्दे उपस्थित केले जातात. परंतु हाच मुद्दा एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्‍यांसाठी वेतन आयोगांची अंमलबजावणी करताना, १० लाख कोटींचे उद्योगपतींचे एनपीए माफ करताना, एक लाख ४५ हजार कोटींचा कॉर्पोरेट टॅक्स कमी करताना का उपस्थित केला जात नाही?

जगामध्ये ज्या ज्या देशांचा विकास झालेला आहे, त्या प्रत्येक विकसित देशामध्ये शेती सरकारच्या मदतीशिवाय चालतच नाही. याचे कारण तेथे शेतीवर अवलंबून असणारा समाज पाच-दहा टक्के इतकाच आहे. हा समाज टिकून राहिला पाहिजे यासाठी तेथे काळजीपूर्वक धोरणात्मक पातळीवर शेती अनुकूल निर्णय घेतले जातात. याउलट आपल्याकडे ६० टक्के समाज शेतीवर अवलंबून असून तो ग्रामीण भागात आहे. पण बदलत्या अर्थरचनेमध्ये ग्रामीण भागातील संकटे वाढवून शहरांत स्वस्त दरामध्ये मजूर उपलब्ध होण्यासाठीची व्यवस्था तयार केली जात आहे. 

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!