शिवसेनेचा इतिहास मोठा आणि, तितकाच आक्रमक व संषर्घाचा सुध्दा आहे. शिवसेनेवर अशी वाईट वेळ येईल याचा कधी कोणीच विचार केला नव्हता. जेव्हा स्व. बाळासाहेब होते. तेव्हा देशातील सगळयाच पक्षाचे नेते ठाकरे यांच्या बाबत आदर बाळगून होेते. त्यांच्या विरोधात कुणाची बोलण्याची हिंमत नव्हती. बाळासाहेब गेल्यानंतर पक्षाने उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगली भरारी घेतली. शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद निर्माण झाल्यापासून भाजपाने शिवसेनेला संपवण्याचा विडाच उचलला व तो पुर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भरल्या ताटावरुन एखाद्याला उठवून त्याची बेईज्जत करावी. त्या प्रमाणे भाजपाने शिवसेनेच्या बाबतीत ‘अतिखुनशी’ राजकारण केलं. भाजपाने असं का केलं? या बाबत वेगवेगळ्या चर्चा होत असल्या तरी भाजपाला आपल्या विरोधकांना मुळासकट संपवायचं आहे. घटक पक्षांना संपवणं तसं सोपं नसलं तरी शिवसेने सारखी परस्थिती निर्माण झाल्यास घटक पक्ष संपवता येतात असा विचार भाजपाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेची ही अवस्था पाहून इतर घटक पक्ष सावध झाल्याशिवाय राहणार नाही.
अतिघाई का केली?
देशातील ज्या काही स्वायत्ता संस्था आहेत. त्या सध्या केद्र सरकारच्या इशार्यावर नाचतात असं सर्रासपणे म्हटले जावू लागले. कोणाच्या दारात कधी ईडी, सीबीआय जाईल याचा नेम नाही. विरोधकांच्याच आज पर्यंत चौकशा का होतात? सत्ताधारी लईच स्वच्छ आहेत का? सत्तेतील एखाद्याची तरी चौकशी व्हायला हवी? शिवसेना, शिंदे यांचा वाद कोर्टात सुरु असतांना निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना दिले. हा निर्णय प्रचंड धक्का देणारा आहे. असा निर्णय लागेल असं वाटलं नव्हतं. हा निर्णय चुकीचा असल्याचा काही तज्ञांचा दावा आहे. कोर्टाचा निकाल लागल्याशिवाय निवडणुक आयोगाने निर्णय द्यायला नको होता असं ही तज्ञाचं मत आहे. निवडणुक आयोग हा केंद्राचा बाहुला झाला की काय? निवडणुक आयोगाने दिलेला निकाल हा कट्टर शिवसैनिकांना अजिबात मान्य झालेला नाही. निवडणुक आयोगाने शिंदे यांच्याकडे किती आमदार, खासदार आहेत. त्या नुसार निर्णय दिला. हे जे आमदार, खासदार फुटले आहेत, ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले. ठाकरे यांच्या कृपेनेच ते निवडून आले. ठाकरे यांनीच त्यांना तिकीट दिले, शिंदे यांनी तिकीट दिलेले नाही. आज फुटीर आमदार, खासदार लोकशाही किंवा अन्य काही भाषा वापरत असले तरी त्याचं बोलणं मुळीच मान्य करता येणार नाही. फुटीर आमदार, खासदार इमानदारी ठाकरे विना निवडून आले असते का? तसं असतं तर त्यांनी राजीनामा देवून निवडणुकीच्या रिंगणात उतरायला हवे होते. फुटीरांनी झोपेत धोंडा घातला. एकनाथराव शिंदे हे आज कितीही वेगवेगळ्या बाता मारत असले तरी शिवसेनेमुळेच शिंदे चर्चेत आले.त्यांना पदे शिवसेनेमुळेच मिळालेले आहेत. सेनेमुळेच ते मोठे सुध्दा झाले. त्यांना इतकी घराणेशाहीची अॅलर्जी होती तर मग आपल्या मुलाला का त्यांनी तिकीट देवून खासदार केले? एका रिक्षावाल्याला शिवसेना किती मोठं करु शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिंदे यांना तिकीटच दिलं नसतं, किंवा राजकारणातच आणलं नसतं तर ते आज इथपर्यंत पोहचले असते का? शिंदे किंवा त्यांचे फुटीर आमदार, खासदार उठ,सुठ बाळासाहेबांचे नाव घेवून उगीच देखावा करतात, म्हणे बाळासाहेबांच्या विचाराला आम्ही बांधील आहोत? शिवसेनेची अशी अवस्था बाळासाहेबांना मान्य झाली असती का?
लोकांच्या भावना
राजकारणात काही प्रमाणात व्यक्तीच्या पाठीमागे चालणारे मतदार असतात. प्रत्येक पक्षात अनेक नेते असतात. त्या नेत्याला मानणारा वर्ग तयार होत असतो. राजकारण हा एक प्रवाह असतो. काल काही वेगळं असलं तरी आज वेगळं असतं आणि भविष्यात वेगळी परस्थिती निर्माण होत असते. पंडीत नेहरु पासून ते नरेंद्र मोदी पर्यंतचे राजकारण वेगळे आहे. राजकारणात नेत्याचा ब्रॅड तयार होतो. लोकांना नेते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आवडत असतात. काहींचे भाषणं आवडतात. काहींचे काम आवडते, मोदी यांना मानणारा मोठा वर्ग देशात तयार झाला. 2014 पुर्वी मोदी यांच्या नावाची चर्चा होती, पण ती नकारात्मक होती. नंतर त्यात बराच बदल झाला. मोदी यांच्यामुळेच दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपाला ‘अतिबहुमत’ मिळालं. स्व.वाजपेयी यांचा एक कार्यकाळ होता. त्यावेळी त्यांनी भाजपाला सत्ता मिळवून दिली होती. केवळ वाजपेयी यांच्यामुळेच त्या वेळच्या लाखो मतदारांनी भाजपाला मतदान केलं होतं. राज्याच्या राजकारणात तसचं आहे. पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन केला. पवारांना मानणारा राज्यात मोठा वर्ग आहे. पवार यांनी पहिल्याच निवडणुकीत ऐंशी पेक्षा जास्त आमदार निवडून आणले होते. तसं शिवसेना हा एक ब्रॅडच आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली व वाढवली. शिवसेनेला मानणारा वर्ग बाळासाहेबांनी निर्माण केला. भलेही आजच्या स्वार्थी राजकारणात काही शिवसैनिक फुटले असतील पण ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या ते मात्र ठाकरे यांच्या सोबत आहेत. शिंदे यांच्याकडे पक्ष गेला. चिन्ह गेलं तरी ज्या प्रमाणात राज्यात जल्लोष व्हायला हवा होता. तसं काहीही दिसून आलं नाही. यावरुनच असं दिसून येतं की, लोकांच्या भावना आणि मत आयोगाच्या निर्णया विरोधातच दिसत आहे. एखादी संस्था किंवा पक्ष उभा करण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. कुठलीच गोष्ट सहजा सहजी निर्माण करता येत नाही. मेहनतीने निर्माण केलेली गोष्ट मात्र सहजपणे संपवता येते, हे कालच्या निकालातून दिसलं.
असं झालं नव्हतं!
पंचवीस, तीस वर्षाच्या राजकारणात असा प्रकार झाला नव्हता. इंदिरा गांधीच्या कार्यकाळात जो प्रकार घडला होता. तो थोडा वेगळा होता. इंदिरा यांना त्यावेळच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी काढून टाकलं जातं. पंतप्रधानांना अध्यक्षांनी पक्षातून काढून टाकल्याची पहिलीच घटना होती. पक्षाने हाकालपट्टी केल्यानंतर इंदिरा यांनी नवा पक्ष स्थापन केला. या नव्या पक्षाला देशातील जनतेने स्विकारुन बहुमताने सत्ता आणून दिली होती. त्याच बरोबर आपल्या विरोधकांना इंदिरा यांनी चांगलाच धडा सुध्दा शिकवला होता. त्यानंतर देशात अशा पध्दतीचा गुंतागुंतीचा पेच निर्माण झाला नव्हता. अनेक नेते पक्षात जमलं नाही तर पक्ष स्थापन करतात किंवा इतर पक्षात प्रवेश करतात. इथं पक्षावरच दावा करुन पक्ष आपल्या ताब्यात घेण्यात आला. देशात बहुपक्षीय राजकारणी व्यवस्था असल्यामुळे राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. पक्षांवर कमांड असणं तितकं गरजेचं आहे. ज्यांची पक्षांवर मजबुत पकड आहे. त्यांच्या पक्षात अशा पध्दतीने धोकेबाजी शक्यतो होत नाही. अशीच अवस्था भाजपाच्या बाबतीत झाली असती तर? मग भाजपाला हे मान्य झालं असतं का?
एक, एक ताब्यात घ्यायचं
भाजपाने लोकशाहीचा गळा घोटायला सुुरुवात केली हे सर्वश्रुत आहे. नाव फक्त लोकशाहीचं घ्यायचं आणि काम मात्र हुकूमशाही पध्दतीनं करायचं. भाजपाला पुर्वी कुणी ओळखत नव्हतं. काही प्रमाणात उत्तर भारतात भाजपा थोडा सक्रीय होता. राज्यात भाजपाचे बेहाल होते. शिवसेनेने भाजपाच्या बोटाला धरुन राज्यात पुढे आणलं. आपली पडती बाजु आहे म्हणुन भाजपाला शिवसेनेचं ऐकावं लागत होतं. त्यावेळी वाजपेयी, आडवाणी याचं पर्व होतं. राज्यात मुंडे, महाजन यांची चलती होती. भाजपाचे सगळेच नेते बाळासाहेबांच्या शब्दाबाहेर नव्हते. 1995 ला राज्यात सत्ता आली ती शिवसेनेमुळेच. मुंबईत शिवसेनाच पावरफुल होती. मुंबईत आज भाजपाचा जो काही विस्तार झाला. त्याला तितकीच मदत शिवसेनेची झालेली आहे, हे नव्या भाजपाच्या नेत्यांनी मान्य करावे. भाजपाला केंद्रात सत्ता आल्यापासून अतिगर्व चढला. आपण आहोत तर कुणीच नाही असा अर्विभाव भाजपाच्या नाकात घुसला त्यामुळे भाजपा इतर पक्षांना कस्पटासमान वागवू लागला. आज पर्यंत मुंबईवर कुणी ताबा मिळवला नाही. यावेळी भाजपाला मुबंई जिंकायची आहे. काही दिवसापुर्वीच पंतप्रधान मोदी मुंबईत येवून गेले. गृहमंत्री अमित शहा हे राज्याच्या दौर्यावर येवून गेले. मोदी, शहा यांना मुंबईतून ठाकरे यांची सत्ता कायमची संपवायची आहे. त्यामुळेच हा सगळा खेळ मांडण्यात आला. विधानसभा, लोकसभेच्या सगळ्या की, सगळ्या जागा त्यांना जिंकायच्या आहेत. तसं वक्तव्य भाजपाच्या नेत्याचं नेहमीच असतं. सगळ्या जागा जिंकायच्या याचा अर्थ बाकीच्या पक्षाला निवडणुक लढवायचीच नाही का? इतर पक्षाच्या एक ही जागा निवडून येणार नाही का? राज्यातील लोक भाजपावर इतके फिदा झाले का?
हे जमेल का?
पक्ष चालवणं तसं सोपं नाही. त्याला रात्र, दिवस कष्ट करावे लागतात. कार्यकर्ते, नेते जोडावे लागतात. पक्षाचा एक विचार असतो. शिंदे यांच्या ताब्यात शिवसेना आली. याचा आनंद शिंदे यांना कमी पण भाजपाला जास्त झाला. कसं काय, आम्ही जिरवली की नाही असं भाजपावाले बॅडबाजालावून सांगू लागले. राजकारणात इतकी कटूता कधीच पाहावयास मिळाली नाही ते यावेळी दिसून आली. शिंदे यांना भाजपाने शिवसेना पक्ष मिळवून दिला. इथून पुढे काय होणार असा ही प्रश्न निर्माण होत आहे. शिवसेना आणि भाजपा एकत्रीत निवडणुका लढवणार हे नक्कीच आहे. शिंदे यांच्या मागे खरचं जनाधार आहे का? दोघांच्या संसारात किती खरेपणा राहिल हे येत्या काळात दिसेल? एकीकडे भाजपाला घटक पक्षांची अॅलर्जी दुसरीकडे शिंदे यांना एक पक्ष मिळवून देणं हे किती दिवस टिकेल? दोन्ही पक्षातील नेत्यात, कार्यकर्त्यात किती दिवस सौख्य राहील हे ही दिसेल? ‘धनुष्यबाण’ शिंदे यांच्या हाती आला. त्याला ते किती प्रमाणात रोखून धरण्यात यशस्वी होतात हे निवडणुकीत दिसणार आहे, नाही तर धनुष्यबाण हाती घेतला तो झेपलाच नाही तर बरगड्या मोडून घेण्याची नामुष्की येणार नाही ना? आता उध्दव ठाकरे यांची अग्निपरिक्षा आहे. ठाकरे यांना राष्ट्रवादीसोबत गेल्याशिवाय गत्यंतर नाही. महाआघाडीची वज्रमुठ एकत्र राहिली तरच भाजपा, शिवसेने समोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे. ठाकरे यांना शुन्यातून विश्व निर्माण करायचं आहे. गेलेले वैभव त्यांना मिळवायचं आहे, ते कशा पध्दतीने मिळवायचं हे त्यांच्यावर अवलंबून आहे. राज्यातील किती शिवसैनिक ठाकरे यांना मानतात हे येणार्या निवडणुकीत दिसणार आहे.