मुंबई (रिपोर्टर) केंद्र सरकारने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे आधार धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये आता ही सुविधा पुढील वर्षापर्यंत कायम राहणार असून, कोणत्याही कार्डधारकाने मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक केलेले नसल्यास त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे म्हटले आहे. हे काम पूर्णपणे ऐच्छिक आहे, जे एक प्रकारे फायदेशीर देखील असेल.
सरकारने अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, आतापर्यंत मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2023 होती, जी आता 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आधार कार्डधारकांना हे काम पूर्ण करण्यासाठी 1 पूर्ण वर्षाचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याचे काम पूर्णपणे ऐच्छिक असून, ते अनिवार्य करण्यात आलेले नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. जर कोणी आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र एकमेकांना जोडले नाही तर त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र, निवडणूक आयोगाने दोन्ही कार्ड लिंक करण्याचे अनेक फायदेही सांगितले आहेत. आयोगाचे म्हणणे आहे की, यामुळे योग्य मतदाराची ओळख आणि एकाच लोकसभा मतदारसंघात एकाच नावाने दोन नोंदणी करणे टाळता येऊ शकते.मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंकिंग ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येते. आपण मोबाइलवरून मेसेज पाठवून किंवा कॉल करून देखील मतदार कार्ड आणि आधार लिंकिंगचे काम पूर्ण करू शकता.