अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल; सप्टेबर-ऑक्टोबरच्या अतिवृष्टीचे अद्याप पैसे नाही, पुन्हा शेतकर्यांवर गारपीटीचे संकट; पालकमंत्र्यांना देणेघेणे नाही, जिल्ह्यातील आमदारही पालकमंत्र्यांवर नाराज
बीड (रिपोर्टर) कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाला तर कधी अतिवृष्टीला सामोरे जाणार्या बीड जिल्ह्यातील शेतकर्यांकडे शासन-प्रशासन व्यवस्थेसह लोकप्रतिनिधींचे सर्रास दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून पालकंमत्री असलेले अतुल सावे यांना बीड जिल्ह्याचे देणेघेणे आहे की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गारपीट होऊन तीन ते चार दिवस उलटल्यानंतरही पालकमंत्री शेतकर्यांच्या बांधावर गेल्याचे पहावयास मिळाले नाही अथवा बीड जिल्ह्यात अन्य घटना, आंदोलने अथवा लोकांच्या विविध अडीअडचणी सावेंनी ऐकून घेतल्या हेही कधी दिसून आले नाही. दुसरीकडे 2022 चच्या सप्टेबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात 410 कोटी रुपये मंजूरही झाले मात्र ते पैसे अद्याप शेतकर्यांच्या पदरात नाहीत.
बीड जिल्ह्याला कोणी वाली आहे का वाली? म्हणण्याची वेळ आता शेतकर्यांवर आली आहे. 2022 च्या सप्टेबर-ऑक्टोबरमध्ये बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. शासनाच्या नियमानुसार 60 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला तर ती अतिवृष्टी ठरते. काही ठिकाणी 60 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आणि सलग चार दिवस रोज 50 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस तेव्हा झाला होता. त्यावेळी शासनाने पंचनामे करून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याचे कबूल करत नुकसानीपोटी 410 कोटी रुपयांची मंजुरी देत घोषणा केली होती. मात्र ते पैसे अद्याप शेतकर्यांना मिळालेले नाहीत. त्यात पुन्हा गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात गारपीट झाली. काही भागात या गारपिटीने मोठे नुकसान झाले. असे असताना बीडचे पालकत्व स्वीकारलेले पालकंमत्री अतुल सावे यांनी मात्र बीड जिल्ह्याच्या शेतकर्यांसह सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. अतुल सावे यांनी पालकत्व स्विकारल्यापासून जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नांसाठी ते कधीच धावून आले नसल्याचे वेळोवेळी दिसून आलेले आहे. एवढेच नव्हे तर सुत्रांच्या सांगण्यानुसार बीड जिल्ह्यातील आमदारांनी सावे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जाते. अतुल सावे यांच्या जिल्ह्यातील दुर्लक्षामुळे अनेक विकास कामे ठप्प झाले आहेत.