सर्वाधिक मजुरी केरळमध्ये 333 रूपये तर सर्वांत कमी छत्तीसगडमध्ये 221 रूपये
महाराष्ट्रात पुर्वी 256 रूपये मजुरी होती आता 273 रूपये झाली
बीड, (रिपोर्टर):- गाव-पातळीवरील मजुरांना गावातच रोजगार मिळावा यासाठी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. रोहयोवर अत्यंत कमी मजुरी मजुरांना मिळत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षात महागाई तिपटीने वाढली. असे असताना रोहयोवरील मजुरीचे दरही तितक्याच प्रमाणात वाढायला हवेत मात्र केंद्र सरकारने मजुरीचे दर 20 ते 25 रुपयांनी वाढवल्याने मजुरात संताप व्यक्त केला जात आहे. सर्वाधिक मजुरी केरळमध्ये 333 रुपये तर सर्वात कमी छत्तीसगडमध्ये 221 रुपये आहे. महाराष्ट्रात पुर्वी 256 रुपये मजुरीचा दर होता आता त्यात 20 रुपयाने वाढ करून 273 करण्यात आली.
महाराष्ट्रासह देशातील सर्वच राज्यामध्ये रोजगार हमी योजना राबविली जाते. गाव पातळीवरील मजुरांना गावात रोजगार मिळावा या दृष्टीकोनातून ही योजना सुरू करण्यात आली. रोहयोअंतर्गत रस्ते, तलाव, नालाबंडींग, विहिरी यासह अन्य कामे केली जातात. रोहयोवरच्या मजुरांना मजुरी अत्यंत कमी दिली जाते. आजची महागाई पाहता मजुरांना रोहयोवरची मजुरी परवडत नाही. इंधनाच्या दरासह गॅसचे व खाद्य तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. इतर वस्तूंच्या भावातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पाच वर्षात महागाई दुपटीने नव्हे तिपटीने वाढली. असे असताना रोहयोवरच्या मजुरीचे दर सुद्धा तितक्याच प्रमाणात वाढायला हवेत, मात्र केंद्राच्या ग्रामविकास विभागाने 20 ते 25 रुपयांनी मजुरीचे दर वाढविल्याने मजुरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सर्वाधिक मजुरीचा दर केरळ राज्यात 333 रुपये, तर सर्वात कमी छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये 221 रुपये आहे. महाराष्ट्रात पुर्वी 256 रुपये मजुरीचा दर होता आता त्यात 20 रुपयांनी वाढ करून तो 273 रुपये करण्यात आला. इतक्या कमी मजुरीवर मजुरांनी मजुरी केली तर त्यांच्या कुटुंबियाच्या गाडा चालेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.