90 दिवसात 65 बळीराजांनी मरणाला कवटाळलं त्यात अवकाळी-गारपीटीचा
16 हजार हेक्टरला फटका; पंचनामे पूर्ण; जिल्ह्यात शेतकर्यांना मोठी मदत करा
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. मार्च महिन्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. यात रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. शेती मालाला नसणारा भाव आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी नैराश्येत जावून आत्महत्या करत आहे. 90 दिवसांमध्ये जिल्ह्यातील 65 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
राज्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यात होतात. बीड जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात नाही, त्याचबरोबर उद्योग क्षेत्राला चालना मिळेली नाही. 60 ते 65 टक्के कुटुंब शेतीवर अवलंबून असतात. बाजारातील शेती मालाचे भाव सतत घसरत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात येत आहे. त्यातच नापिकीमुळे शेतकर्यांना शेती परवडायना गेली. यावर्षी कापसाचं चांगलं उत्पादन निघालं असलं तरी कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने साठ ते सत्तर टक्के शेतकर्यांचा कापूस विकला जाऊ शकलेला नाही. एकूणच सर्व परिस्थिती पाहता शेतकरी नैराश्येत जात असल्याने तो आत्महत्येसारखा मार्ग पत्करतो. 90 दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील 65 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासकीय पातळीवर करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. मार्च महिन्यात बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात 16.972 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले. बाधीत क्षेत्रांचे पंचनामे महसूल विभागाकडून करण्यात आले. राज्य सरकारने शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत घोषीत करणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यामध्ये शेतीचा मसनवाटा झाला. रोज दोन ते तीन शेतकरी मरणाला जवळ करत असून शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या ही चिंतेची बाब आहे.