पालसिंगण आणि चांदणी गावात आलेल्या अनुदानात एक एक्करवाल्यांना 40 हजार अनुदान तर वीस एक्करवाल्यांना 2 हजार अनुदान
बीड (रिपोर्टर):- बीड मतदार संघात 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकर्यांचे हातातोंडाशी आलेले पीक आणि पशुधनाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. यावर आ.संदीप क्षीरसागर यांनी वेळोवेळी राज्य शासनाशी पाठपुरावा करून बीड मतदार संघाकरिता शासनाकडून अनुदान मंजुर करून घेतले पण या अनुदान वाटपात मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाली असून मतदार संघातील पालसिंगण आणि चांदणी या गावातील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे शासनस्तरावर होवून येथील शेतकर्यांना अनुदान आले आहे. पण अनुदानात 2 एक्कर असलेल्या शेतकर्यांना आणि 20 गुंठ्ठे असलेल्या शेतकर्यांना 40 हजार रूपये अनुदान मिळाले असून 20 एक्कर शेती असलेल्या शेतकर्यांना 2 हजार रूपये अनुदान मिळाले आहे. यात मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या असून गट नं., अकाऊंट नंबर चुकीचे देण्यात आले आहे.
पालसिंगण व चांदणी या गावातील 604 लाभार्थी शेतकर्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. पण शासनाच्या नियमाप्रमाणे हेक्टरी 13 हजार 600 रूपये मिळावेत असा शासन निर्णय शासनाचा असून तलाठी व अकाऊंट डिपार्टमेंटच्या चुकीमुळे वितरित अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाली आहे. या संदर्भात बीड मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, डॉ.बाबू जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बीडचे तहसीलदार हजारे यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून या अनुदानात झालेल्या प्रकाराची तातडीने चौकशी करून असे आश्वासन तहसीलदार यांनी शिष्ट मंडळास दिले आहे. याप्रसंगी पालसिंगण व चांदणी गावचे सरपंच समाधान झांबरे, उपसरपंच गोकुळ जगताप, संजय जगताप, श्रीकांत डंबरे, भीमराव खंडागळे, नितीन जगताप, कल्याण जगताप, विश्वंभर जगताप यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.