बीड, केजला प्रतिष्ठा, ग्रा.पं. मतदारसंघात संदीप क्षीरसागर जड अन्य मतदारसंघात प्रचंड टफ, परळी, अंबाजोगाई, गेवराई राष्ट्रवादीला सेफ, पाटोदात धस भारी, वडवणी मतभेदाची
बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून) जिल्हाभरातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येत असून अनेक ठिकाणी मातब्बरांच्या तोंडाला विरोधकांनी फेस आणल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. साम-दाम-दंडाची भाषा निवडणुकीत सुरू झाली असून काही ठिकाणी मतदारांची उचलाउचलीही झाल्याचे समोर येत आहे. बीड आणि केज बाजार समितीमध्ये दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर बाजार समिती आपल्याच ताब्यात यावी यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करीत आहेत. इकडे गेवराई, परळी, अंबाजोगाई या तिन्ही बाजार समित्या राष्ट्रवादीसाठी सेफसाईड मानल्या जात असून धसांनी कडा बिनविरोध काढल्यानंतर आता पाटोद्यातही निवडणुकीदरम्यान त्यांचेच वर्चस्व पहावयास मिळत आहे. माजलगावमध्ये आ. सोळंकेंना रोखण्यासाठी रामकृष्ण होके पाटील, रमेश आडसकर, आर. टी. देशमुख, मोहन जगताप हे प्रयत्नांची परिकाष्ठा करीत असले तरी आ. सोळंकेंचा या बाजार समितीवर वरचष्मा असणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. वडवणीत बाजार समितीची निवडणूक मतभेदांची होत असल्याचे दिसून येत असून मूळ पक्षांचे एकमेकांचे विरोधक झाल्याचे चित्र या निवडणुकीमध्ये लोकांना पहावयास मिळत आहे. इथेही मुंडे-आंधळेंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
बीडमध्ये कमालीची प्रतिष्ठा
चाळीस वर्षांपासून बाजार समितीवर एकाधिकारशाही गाजवणार्या माजी मंत्री क्षीरसागर यांना आ. संदीप क्षीरसागरांनी कडवे आव्हान देत विरोधकांची मोट बांधून बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी मोठी ताकद लावली. भाजपाचे राजेंद्र मस्के, शिंदे सेनेचे कुंडलिक खांडे, उद्धव सेनेचे अनिल जगताप, शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सोबत घेऊन ही निवडणूक लढवत असल्याने माजी मंत्र्यांसमोर मोठे आव्हान उभे राहत असून ग्रामपंचायत मतदारसंघात आ. संदीप क्षीरसागर हे वरचढ दिसून येत आहेत. सोसायटीसह अन्य मतदारसंघातही संदीप क्षीरसागरांनी कमालीची आघाडी घेतली असून त्यांना रोखण्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर सर्व ते प्रयत्न करताना दिसून येत आहेत. आमदारांकडे बाजार समितीसाठी नवे चेहरे आहेत तर माजी मंत्र्यांकडे बाजार समितीसाठी तेच ते चेहरे देण्यात आल्याने दोघांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
परळी, अंबाजोगाई,
गेवराईत गर्भगळीत विरोधक
परळी बाजार समिती राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असून या निवडणुकीतही या ठिकाणी एकतर्फी राष्ट्रवादीचा वचरष्मा राहणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. अंबाजोगाईमध्ये धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात साठे-दौंड-पापा मोदी एकत्रित असल्याने या ठिकाणी मुंदडांना म्हणावे तसे यश मिळणे अशक्य आहे त्यामुळे या तिन्ही बाजार समिती राष्ट्रवादीच्या खेम्यात जाणार हे निश्चित झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
माजलगावमध्ये सोळंके जड
वडवणीत अनिश्चिततेची कळ
खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आ. प्रकाश सोळंके यांनी दबदबा निर्माण केल्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठीही सोळंकेंनी आखाड्यात आपले उमेदवार उभे केले आहेत. सोळंकेंना विरोध करण्यासाठी रमेश आडसकर, राधाकृष्ण होके पाटील, आर. टी. देशमुख, मोहन जगताप हे कडवे प्रयत्न करत असले तरी या ठिकाणी सोळंके हेच वरचढ दिसून येत आहेत. वडवणीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा पॅनल असला तरी या ठिकाणी पक्षीय मतभेद मोठ्या प्रमाणावर उफळून आल्याचे दिसून येते. भाजपाचे राजाभाऊ मुंडे यांना केशव आंधळेंचा विरोधक अन् राष्ट्रवादीचे नहार यांची मुंडेंना साथ पाहितली तर या ठिकाणी वैयक्तिक पातळीवर निवडणूक होताना दिसून येते. विशेष म्हणजे प्रकाश सोळंके आणि केशवराव आंधळे यांचा गट प्रभावीपणे विरोधकांसर भारी पडत आहे. उद्धव ठाकरे सेनेतही इथे दोन गट असून माजी तालुकाप्रमुखांचा राष्ट्रवादीला पाठिंबा तर विद्यमान तालुकाप्रमुखाचा भाजपाला पाठिंबा दिसून आला आहे.
केजमध्ये मतदारांची उचलाउचली
भाजपाचे रमेश आडसकर, राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात या निवडणुकीत कडवी फाईट असली तरी शिंदे सेनेने या ठिकाणी आपले उमेदवार दिल्याने सदरच्या निवडणुकीमध्ये अधिकृत चुरस निर्माण झाली आहे. रमेश आडसकर यांच्या ताब्यातून सदरची बाजार समिती काढण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रतिष्ठा पणाला लावली जात असून सोनवणे, आडसकर या भागातले मातब्बर असल्याने थेट मतदारांचीच उचलाउचली आतापासून होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. या ठिकाणी भाजपाचे अन्य नेते रमेश आडसकर यांचे काम करत नसल्याचेही सांगण्यात येत असून त्यामुळे बजरंग सोनवणेंना बाजार समितीत आपले दुकान मांडण्यासाठी व्यवस्थीत जागा मिळत आहे.