बीड, (रिपोर्टर):- शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगुन लोकांना धमकावणे, विनयभंग करणे, खंडणी मागणे, वाटमारी करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे यासह आदी गुन्हे दाखल असलेल्या खंडणीखोरावर बीड पोलीसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला हर्सुल कारागृहात स्थानबद्ध केले.
बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर वारंवार गुन्हे करणार्या गुंडावर एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाया करत आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुधीर हनुमंत उर्फ हनुमान वाघमारे, रा. अंबिका चौक पांगरी रोड बीड याच्या विरोधात विविध गुन्हे दाखल आहे. पोलीसांनी त्याला समज देवुनही तो वारंवार गुन्हे करत राहीला. लोकांना धमकावुन खंडणी घेवु लागला, त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांनी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीडीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे मांडला होता. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी दि. 25 रोजी प्रस्तावावर सही करताच पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेवुन हर्सुल कारागृहात स्थानबद्ध केले. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे केतन राठोड, पोलीस उपनिरीक्षक पाथरकर, पो.ह. परजने, सारणीकर, पो.ह. अभिमन्यु औताडे, शेख नसिर यांनी केली.