22 प्रवेशअर्जासह 1 लाख 76 हजाराची रोकड जप्त
आ.प्रकाश सोळंकेंेच्या उपस्थितीत शिक्षणाधिकारी, पोलीसांचा छापा
प्रवेशासाठी 20 हजारापेक्षा
जास्त रक्कमेची बोली
दिनकर शिंदे । माजलगाव
संघ प्रणित भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गात प्रवेश घेण्यासाठी पालकांकडून हजारो रुपये उकळणार्या सिद्धेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संचालकाचा लाचखोरीचा पर्दाफाश झाल्याने माजलगावसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आ.प्रकाश सोळंके यांच्यासह शिक्षण अधिकारी आणि पोलीस यांनी संयूक्तपणे शिक्षणाचा बाजार भरवणार्या सिद्धेश्वर विद्यालयाच्या संचालकास पालकांकडून पैसे घेताना एका मंगल कार्यालयामध्ये रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 1 लाख 76 हजाराची रोख रोकड जप्त केली असून त्या ठिकाणी 22 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज छापा टाकण्यासाठी गेलेल्या यंत्रणेला मिळून आले आहेत. या प्रकरणी उपस्थित दोन शिक्षकांना पोलीसांनी ताब्यात घेतले तर संचालक खुर्पे घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात येते.
या खळबळजनक घटनेची अधिक माहिती अशी की, माजलगाव शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाची माध्य. आणि उच्च माध्य. शाळा आहे, या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 20 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत अवैधपणे डोनेशन द्यावे लागते. पैशाशिवाय सर्वसामान्यच काय श्रीमंतांनाही या ठिकाणी प्रवेश मिळत नव्हता. सध्या माध्य. आणि उच्च माध्य विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या शाळेचे संचालक अमरनाथ खुर्पे हे प्रवेशासाठी पैसे घेत असल्याची ओरड झाल्यानंतर दस्तूखूद आ.प्रकाश सोळंके, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, बीओ लक्ष्मण ढेसाळकर, पीआय फराटे यांनी अमरनाथ खुर्पे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकाकडून पैसे घेत आहेत त्या वैष्णवी मंगल कार्यालयावर धडकले, त्या ठिकाणी छापा मारला असता अनेक पालक उपस्थित असल्याचे दिसून आले. पालकांकडून प्रत्येकी 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रुपये प्रवेशासाठी घेत असल्याचे लक्षात आले. घटनास्थळी विद्यालयाच्या संचालकाकडे 1 लाख 76 हजार रुपयांची नगदी रोकड सापडली, त्याचबरोबर 22 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज घटनास्थळी मिळून आले. संघाच्या शाळेमध्ये सर्रासपणे लाचखोरीचा व्याभिचार होत असल्याचे या घटनेतून निदर्शनास आले. या प्रकरणी दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले तर संबंधीत संचालक अमरनाथ खुर्पे हा घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात येते. सदरचा छापा आज दुपारी 12 ते 12.30 च्या सुमारास टाकण्यात आला. या घटनेने शिक्षणाचे बाजारीकरण सर्रासपणे झाल्याचे उघड होते.
बाप रे! संघाच्या
शाळेचे संचालक लाचखोर
संस्कार आणि संस्कृतीचा डांगोरा पिटवत देशाला आणि जगाला धडे देवू पाहणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाळेत लाचखोरी सर्रासपणे होत असल्याचे दिसून आले. माजलगावच्या संघ प्रणित भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिद्धेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात हा लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
येथे चालायचा
पैशाचा व्यवहार
राष्ट्रीय स्वयंसेवा संघ प्रणित सिद्धेश्वर विद्यालयाच्या संचालकासह शिक्षक प्रवेशासाठी पालकाकडून पैसे घ्यायचे, त्यासाठी ते शिक्षण संस्थेच्या कार्यालयात नव्हे तर बाजुला असलेल्या वैष्णवी मंगल कार्यालयात बसायचे, हे कार्यालयही या संस्थेशी सलग्न असलेल्या जगदीश खाकरे यांचे आहे. येथूनच पैशाचा व्यवहार आणि लाचखोरीचा धंदा सुरू असायचा. आज पोलीसांनी याच ठिकाणी छापा मारला.