बीड (रिपोर्टर) मी दिल्लीला संसदेत जाण्या इतपत मोठा झालेलो नाही. मी आणखी लहान आहे. मातीतल्या माणसासाठी काम करत आहे, तेच काम मला आणखीन करायवयाचे आहे. बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला झालेला आहे. यावर्षी पक्ष रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्ताने पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांचे नगर येथे रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाची सभा होत असून या सभेला बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होतील, असे आ. धनंजय मुंडे यांनी सांगितले.
ते बीड येथे राषट्रवादी काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेला आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. संजय दौंड, माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आ. सय्यद सलीम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, रंजल्या-गांजलेल्या आणि मातीतल्या माणसासाठी मी अहोरात्र काम करत आहे आणि हेच माझ्या आवडीचे काम आहे. त्यामुळे मी दिल्लीला संसदेत जाण्याइतपत मोठा झालेलो नाही. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकातही मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालेलं आहे. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीला आहे. जवाहर एज्युकेशनची निवडणूक आणि वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक यांचे सर्व निकाल अद्याप येणे बाकी आहे. या निवडणुका आम्ही गुपचूप संगनमत करून लढवल्या नाहीत तर हाबूक ठोकून लढवलेल्या आहेत. बीड जिल्ह्यात येणार्या वंदे मातरम रेल्वेसाठी बनवण्यात येणारा रेल्वे डब्यांचा कारखाना हा शेजारच्या लातूर जिल्ह्यामध्ये स्थलांतरीत झाला आहे ही बीडच्या खासदार यांचे मोठे अपयश आहे. जर हा कारखाना बीड जिल्ह्यात आला असता तर बीड जिल्ह्यातील बेरोजगारी कमी होऊन हा जिल्हा औद्योगिक जिल्हा झाला असता. ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही बीड जिल्ह्याची ओळखही मोठ्या प्रमाणात पुसली गेली असती. नुकतेच पालकमंत्र्यांनी जो जिल्हा नियोजनचा निधी वाटप केला त्याला कोणता प्रोटोकॉल लावला हे तुम्हा-आम्हा सर्वांना माहितच आहे. ते परकिय पालकमंत्री असल्यामुळे त्यांना जिल्ह्याचे काही देणेघेणे नाही. त्यांच्या वागणुकीमुळे बीड जिल्ह्याला पालकमंत्री आहे की नाही, अशी शंका येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहे . रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पक्षाच्या वर्धापनदिनाची सभा संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये नगर येथे होत असून बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी आणि सदस्य या सभेत सहभागी होतील, असेही धनंजय मुंडे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
दहा टक्के कमिशन घेऊन डीपीडीसीचा निधी पालकमंत्र्यांनी वाटला -आ. आजबे
धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेत आ. आजबे यांनी बोलताना म्हटले की, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी निधी वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डावलले असून निधीसाठी जे कोणी 10 टक्के कमिशन देतील, अशांनाच निधीचे वाटप करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांनी 10 टक्के कमिशन गोळा करण्यासाठी बीड जिल्ह्यात आपले एजंट नेमले होते, असेही आजबे यांनी पालकमंत्र्यांवर या पत्रकार परिषदेत आरोप केले.