जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची संयुक्त मोहीम; गुंडगिरी, अवैध धंदे आणि दहशतीविरोधात मोठा दणका
बीड : ऑनलाईन रिपोर्टर
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच दिवशी पाच कुख्यात गुंडांवर MPDA कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी मोहीम राबविण्यात आली. गुंडगिरी, अवैध धंदे, वाळू माफिया, खंडणीखोर आणि समाजकंटकांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.


पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यापासून गुन्हेगारी रोखण्यासाठी सातत्याने धडक मोहीम सुरू केली आहे. त्याला जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांची ठोस साथ लाभत आहे. याच पार्श्वभूमीवर MPDA आणि MCOCA अंतर्गत गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेत पोलीस ठाणे केज, पेठ बीड, बीड ग्रामीण आणि बीड शहर येथील अधिकाऱ्यांनी विविध गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरोधात प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार जुबेर ऊर्फ मारी ऊर्फ पाप्या मुस्ताक फारोकी (रा. रोजा मोहल्ला, केज), मोमीन सलीम मोमीन शब्बीर (रा. मोमीनपुरा, बीड) आणि तुकाराम लक्ष्मण पवार (रा. नवगण राजुरी, ता. बीड) यांच्यावर MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच आणखी दोन गुंडांविरोधातही प्रक्रिया सुरू असून त्यातील एक आरोपी न्यायालयीन कोठडीत तर दुसरा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जुबेर फारोकी याच्याविरोधात घरात घुसून मारहाण, जबरीने पैसे उकळणे, चोरी, धारदार शस्त्राने हल्ला, शिवीगाळ, जिवे मारण्याच्या धमक्या अशा गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे पोलिसांनी नमूद केले.
मोमीन सलीम याच्याविरोधात अवैध शस्त्र बाळगणे, दारूसाठी पैसे मागून मारहाण करणे, चोरी, महिलांविषयी अश्लील मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करणे, धमक्या देणे यांसारखे सहा गंभीर गुन्हे नोंद आहेत. पेठ बीड परिसरात त्याची दहशत निर्माण झाली होती.
तर तुकाराम पवार हा अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणे, वाहतूक व विक्री करणे या प्रकारांत सक्रिय होता. त्याच्यावर आठ गुन्ह्यांची नोंद असून गावातील युवकांना व्यसनाधीन करून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी २२ मे २०२६ रोजी MPDA अंतर्गत आदेश पारित करून संबंधित इसमांना तात्काळ ताब्यात घेऊन हर्सूल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक करून कारागृहात दाखल केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली.
दरम्यान, भविष्यातही वाळू माफिया, अवैध गुटखा विक्रेते, काळाबाजार करणारे, जातीय तेढ निर्माण करणारे समाजकंटक, खंडणीखोर, जुगार व लॉटरी व्यवसाय करणाऱ्यांवर MPDA आणि MCOCA अंतर्गत कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी दिला आहे.











