बीड (रिपोर्टर): मित्राच्या लग्नासाठी बीडकडे येणार्या मारुती सुझुकी सियाज कारला आज पहाटे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पेंडगाव परिसरातील घोसापुरी जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात तिघे जण जागीच ठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कार चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कारने तब्बल दोन ते तीन पलट्या खाल्ल्या. कारचा वेग अधिक असल्याने गाडीमधील तिघे जण मृत्युमुखी पडले. घटनेची माहिती होताच घटनास्थळावर महामार्ग वाहतूक पोलिसांसह अन्य कर्मचारी दाखल झाले. सदरचा अपघात पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
नेवासा येथील मित्राचे लग्न बीड येथे असल्याने या विवाहसाठी रात्री अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथून विवेक विश्वास कांगुणे, प्रियश ऊर्फ रोहन रमेश वाल्हेकर, धिरज प्रकाश गुंदेचा आणि आनंद वाघ हे चौघे मारुती सुझुकी सियाज (क्र. एम.एच. 17 बी.व्ही.9673) या कारने बीडकडे येत होते. मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची कार पेंडगावजवळील घोसापुरी गावानजीक आली असता गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कारने दोन ते तीन पलट्या खाल्ल्या. गाडीचा वेग अधिक असल्याने या भीषण अपघातात विवेक कांगुणे, प्रियश वाल्हेकर, धिरज गुंदेचा हे तिघे जण जागीच ठार झाले तर आनंद वाघ हा गंभीर जखमी झाला. अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला.
या अपघाताची माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांना समजल्यानंतर घटनास्थळावर पीएसआय घोडके, रवींद्र नागरगोजे, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे लक्ष्मण जायभाये, रवी सानप तसेच महामार्ग पेट्रोलिंग टिमचे प्रतीक कदम, सुनिल कवडे, राम गायकवाड, महामार्ग रुग्णवाहिका व डॉ. विशाल डोंगरे, यशवंत शिंदे, सुभाष नन्नवरे, जयसिंग वाघ, दिगांबर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. जखमी आनंद वाघ यास बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर वाघ यांना बीडच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.