Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रपुण्यात पंतप्रधान मोदींचे मंदिर रातोरात हटवले देव चोरीला गेला, म्हणत रा.कॉं.ने आंदोलन...

पुण्यात पंतप्रधान मोदींचे मंदिर रातोरात हटवले देव चोरीला गेला, म्हणत रा.कॉं.ने आंदोलन केले

पुणे (रिपोर्टर):- पुण्याच्या औंध भागात बांधण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी देव चोरीला गेला म्हणत आज आंदोलन करून दरवाढ कमी करण्यासाठी आता आम्ही कुणाकडे साकडे घालायचे? असा सवाल करून उपहासात्मक आंदोलन केले. एकीकडे जनता महागाईने परेशान आहे, रोज पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा स्थितीत पंतप्रधान थेट तर दखल घेतच नाहीत, त्यांचा पुतळा तरी दखल घेईल, असे उपहासात्मक टोलेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या वेळी लगावले.


पुणे येथील औंध भागात मयुर मुंडे नावाच्या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधून त्यामध्ये नरेंद्र मोदींचा पुतळा बसवला. याची माहिती माध्यमांद्वारे सर्वत्र झाल्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस महागार्स हटवण्यासाठी साकडं घालायला मंदिराजवळ आली. मात्र त्याच दरम्यान रातोरात मंदिरातून पुतळा हटवण्यात आला होता. मंदिरही झाकण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कायर्कर्त्यांनी उपहासात्मक आंदोलन करत देव चोरीला गेल्याने आम्ही आंदोलन करत असल्याचे सांगितले. पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे? आमच्या नवसाला कोण पावणार? असे सवाल उपस्थित करत पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. आता तरी देव आम्हाला पावणार का? महागाई कमी करणार का? बेरोजगारांना रोजगार देणार का? असे म्हणत राष्ट्रवादीने आंदोलन केले.

Most Popular

error: Content is protected !!