परळीत वंचीतचा जनआक्रोश मोर्चा
पोलीस प्रशासनासह शासनाचा धिक्कार
परळी (रिपोर्टर): बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहीली नसून गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यासह राज्यात दलित-मुस्लिमांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ले केले जातात, जनतेचे रक्षण करणारी पोलीस यंत्रणा ही जाणीवपुर्वक सर्वसामान्यांना त्रास देते, असं म्हणत वचीत बहुजन आघाडीच्या वतीने जरीन खान यांना अमानूष मारहाण करून त्याचा जीव घेणार्या परळीतील दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करा, त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला.
वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने आज परळीमध्ये पोलीस प्रशासन आणि शासनाविरुद्ध जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात असंख्य नागरीकांनी सहभाग नोंदवला होता. परळीत पोलीस ठाण्यात मृत्युमुखी पडलेल्या जरीन खान मृत्यूप्रकरणी दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करा, कुटुंबियाला 50 लाखांची आर्थिक मदत द्या, नगर जिल्ह्यातील अकोले येथील अशरफ अतिक शेख यांच्या खुन्यांना शोधा, जळगाव, अंमळनेर येथील अशफाक शेख यांची कोठडीत हत्या करण्यात आली, तेथील दोषींना निलंबीत करून न्यायालयामार्फत चौकशी करा, परळी तालुक्यातील कदम कुटुंबियावर झालेला जीवघेण्या हल्ल्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा, रेणापूर येथील मातंग बांधवांच्या खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.