आरोप करणार्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी
दुपारपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन झाले नाही
बीड (रिपोर्टर): बीड शहरातील एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत सदरील तरुणाने गेल्या 35 दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर जाळून घेतले होते, यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्याचा आज मृत्यू झाला. खोटा गुन्हा दाखल करणार्या महिलेसह अन्य एका विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली असून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन न करू देण्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला.
संदीप पिंपळे (वय 29, रा. बीड ) या तरुणावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. सदरील हा गुन्हा माजलगावहून बीडकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपळे याने जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर 35 दिवसांपूर्वी जाळून घेतले होते. यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. महिलेने खोटा गुन्हा दाखल केला असून महिलेसह अन्य एका जणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी पिंपळे यांच्या नातेवाईकांनी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा दुपारपर्यंत घेण्यात आला होता.