केज (रिपोर्टर) घरामध्ये कोणीच नसल्याची माहिती घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करत नगदी 50 हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारच्या मध्यरात्री केज शहरातील उमरी रोडवर असलेल्या सहयोग नगर भागात घडली. घटनास्थळी केज पोलिसांनी भेट दिली असून चोरट्यांचा माग काढणे सुरू आहे.
याबाबत अधिक असे की, केज शहरातील उमरी रोडवर असलेल्या सहयोग नगर भागामध्ये ज्ञानेश्वर परमेश्वर सोळंके यांचे घर आहे. काल सकाळी सोळंके कुटुंब घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. आज सकाळी जेव्हा हे कुटुंब घरी आलं तेव्हा घराचे कुलूप तुटलेले दिसले. याची माहिती त्यांनी तात्काळ पोलिसांना दिली तेव्हा अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले नगदी पन्नास हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस ठाण्याचे पीएसआय राजेश पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा सुरू केला असून या चोरीच्या घटनेने केज शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे.