एक तास महामार्ग जाम; चार किलोमीटरवर वाहनांच्या रांगा; महिला, अबालवृद्धांसह विद्यार्थ्यांनी शासन, प्रशासनाविरोधात व्यक्त केला संताप
दिंद्रुड(रिपोर्टर): बीड-परळी हायवे पासून तीन किलोमीटर आंतर असलेल्या चोपनवाडीकरांना रस्त्यासाठी चार वर्षापासून संघर्ष करावा लागत असून, शेवटी काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी बीड-परळी महामार्ग चोपनवाडीकरांनी एक तास जाम करून टाकला होता. येथील रास्ता रोको आंदोलनात चार किलोमीटर पर्यंत दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड नजीक असलेल्या चोपनवाडी ला बीड-परळी हायवेवरून रहदारी असल्याने या रस्त्याला मंजुरी मिळून जवळपास चार वर्षे लोटत आले आहेत. मात्र अद्याप या रस्त्याचे काम न झाल्याने अनेक अडचणींना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बीड- परळी हायवे ते चोपनवाडी या पावणे तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली. जवळपास एक कोटी तीस लाख रुपये मंजुर झाले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून रस्त्याचे काम न झाल्याने अनेक हालअपेष्टा चोपणवाडी ग्रामस्थांना भोगाव्या लागत आहेत. चोपनवाडी ते बीड-परळी हायवेवर ये-जा करताना जवळपास पाऊण तास वेळ लागत असून, त्यातही तारेवरची कसरत केल्यागत येथील ग्रामस्थांना वागावे लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना केवळ रस्ता खराब असल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. अबालवृद्ध, रुग्ण, शाळेतील विद्यार्थ्यांना प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास या खराब रस्त्यामुळे होत असून तात्काळ रस्त्याला मंजुरी देऊन तातडीने रस्ता देण्याची मागणी चोपनवाडीकरांनी केली आहे.
मात्र आमदार, पालकमंत्री व प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने चोपनवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत स्वातंत्र्यदिनी बीड-परळी हायवेवर रास्ता रोको आंदोलन केले. गावातील विद्यार्थ्यांसह अबालवृद्ध, महिला या आंदोलनात सहभागी झाले होते. बांधकाम विभाग बीडचे कार्यकारी अभियंता फड यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. दिंद्रुड पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.