बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची बीडमध्ये उद्या (दि.17) रोजी ’स्वाभिमान’ सभा होणार आहे. नाशिकच्या येवल्यात झालेल्या सभेनंतर हि दुसरी सभा असणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्रात पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी व राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा एकदा बळकटी देण्यासाठी खा.शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. बीड मध्ये होणार्या या सभेची जबाबदारी बीड विधानसभा मतदारसंघाचे
आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आली आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली असून खा.शरद पवार यांच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांनी पक्षाची मोट बांधण्यासाठी स्वतः कंबर कसली. नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघात पहिली सभा घेऊन आपल्या राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला ताकद देण्यासाठी सभासत्र कार्यक्रम सुरू केला. परंतु तब्येतीच्या कारणामुळे या कार्यक्रमात बराच खंड पडला होता. मुंबईतील पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर दि.5 ऑगस्ट रोजी खा.शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी बैठकीत बीडच्या सभेची घोषणा केली. या सभेची जबाबदारी नवनिर्वाचित बीड जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली. आ.क्षीरसागर यांनीही जबाबदारी दिल्यानंतर पूर्ण ताकदीनिशी या सभेसाठी नियोजनपूर्ण तयारी केली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पूर्वतयारी बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून या सभेचे नियोजन केले. ही सभा महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या सभेला आ.जयंत पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, आ.जितेंद्र आव्हाड, आ.राजेश टोपे, खा.डॉ.अमोल कोल्हे, , आ.रोहीत पवार, रोहीत आर.आर. पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.
अशी असेल पार्किंग व्यवस्था
आष्टी-पाटोदा-शिरूर कासार कडून बीडकडे येणार्या वाहनांसाठी जुनी पंचायत समिती कार्यालयाचे आवार, आयटीआय ग्राउंड, चंपावती शाळेचे मैदान, तहसिल कार्यालय येथील मागच्या बाजुचे आवार, शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे आहे.
माजलगाव-गेवराई-गढी कडून बीडकडे येणार्या वाहनांसाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण, जिल्हा परिषद कार्यालय याठिकाणी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे.
परळी-अंबाजोगाई-केज-धारूर-वडवणी कडून बीडकडे येणार्या वाहनांसाठी सर्कस ग्राउंड, मित्रनगर व छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण तसेच बागलाने इस्टेट, नाट्यगृह रोड, बीड याठिकाणी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे.
साहेबांची सभा रेकॉर्ड ब्रेकच होणार-आ.संदीप क्षीरसागर
उद्या (दि.17 ऑगस्ट) रोजी होणार्या ’स्वाभिमान’ सभेतून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे नेतृत्व खा.शरदचंद्र पवार साहेब यांनीच करावे अशी जनसामान्यांची भावना आहे. सद्यस्थितीला देशात प्रतिगामी विचार वाढवून जातीवाद-धर्मवादाच्या नावाखाली द्वेष पसरविण्याचा डाव सुरू आहे. हा डाव मोडून काढण्यासाठी समतेच्या दिशेने, पवार साहेबांच्या पुरोगामी विचारांवर चालणे गरजेचे आहे. आम्ही सभेच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 40 पेक्षा जास्त बैठका घेतल्या. या बैठका कॉर्नर बैठका म्हणून नियोजीत होत्या, परंतु आम्ही जिथे गेलो तिथे या बैठकांचे रूपांतर सभेत झाले. बीड जिल्ह्यात पवार साहेबांवर प्रेम करणारा व त्यांच्या विचारांना मानणारा खूप मोठा आकडा आजही आहे्. त्यामुळे बीडमध्ये होणारी ’स्वाभिमान’ सभा रेकॉर्ड ब्रेकच होणार आहे, महाराष्ट्रच काय तर दिल्लीही पाहत राहील. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे. तसेच गुरूवार (दि.17) रोजी दुपारी 12 वाजता बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स समोर, पारस नगरी येथील मैदानात सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ.क्षीरसागर यांनी केले आहे. तसेच नियोजीत पार्किंग व्यवस्थेचाच उपयोग कार्यकर्त्यांनी करावा. कुणीही सभास्थळी वाहने आणू नयेत. पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा असेही आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.