राज्यात 1 कोटी 65 लाख शिधापत्रिका धारक
बीड (रिपोर्टर): राज्य सरकारने आनंदाच्या शिध्याची घोषणा केली मात्र तो वेळेवर मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गतदिवाळीला अशाच पद्धतीची घोषणा केली होती मात्र बहुतांश लाभार्थ्यांना शिधा पोहचलाच नव्हता. काही दुकानदारांनी शिध्याची इतर ठिकाणी शिध्याची वाट लावल्याचे दिसले होते. येत्या चार-पाच दिवसात हा आनंदाचा शिधा राशन दुकानांवर मिळणार असल्याचे सांगण्यात येते. राज्यात 1 कोटी 65 लाख 256 कार्डधारक आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरी गणपती सणानिमित्त शंभर रुपयात आनंदाच्या शिध्याची घोषणा केली. यामध्ये रवा, साखर, हरभरा डाळ यांचा समावेश आहे. गत दिवाळीला अशाच पद्धतीच्या शिध्याची घोषणा केली होती. ‘गोरगरीबांची दिवाळी गोड करू’, अशा गगनभेदी घोषणा केली होती. मात्र बहुतांश कार्डधारकांना हा शिधा मिळालाच नाही. काहींना साखर मिळाली तर तेल मिळाले नव्हते. आता या वेळेस तशीच परिस्थिती निर्माण होणार का? अश प्रश्न आहे. राशन दुकानदार योग्य पद्धतीने माल वाटप करत नसल्याच्या तक्रारी येतात. काही बोटावर मोजण्याइतके राशन दुकानदार राशनचा माल वाटप करतात. पुरवठा विभाग राशन वाटपासंदर्भात योग्य ती ठोस भूमिका घेत नसल्याने राशनचा माल सर्रासपणे काळ्या बाजारात विक्री होत आहे. राज्यभरात 1 कोटी 65 लाख 256 कार्डधारक आहेत. या सर्व कार्डधारकांना खरच आनंदाचा शिधा मिळेल का?