गुळज, लऊळ, धोंडराई फाटा, मोहा येथील घटना
गेवराई (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रात्री संतप्त आंदोलकांनी चार ठिकाणी बसवर दगडफेक करत त्या जाळल्या. यामध्ये माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माजलगाव ते कवडगाव मार्गे धावणारी बस क्र. एम.एच. बी.एल. 0589 ही गजानन विद्यालयासमोर लऊळ 1 येथे आली असता अज्ञात चार इसमांनी बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. दुसरी घटना मोहा येथील सरकारी दवाखाना येथे मुक्कामी बस थांबली असता अज्ञात आठ ते नऊ आंदोलकांनी बसच्या काचा फोडल्या व आग लावून बसचे नुकसान केले
. तिसरी घटना गुळज येथे घडली आहे. एसटी बसमधील प्रवासी उतरत असताना रात्री साडेसातच्या दरम्यान अज्ञात 50 ते 60 इसमांनी बस अडवून बसवर दगडफेक करत पेट्रोल व डिझेल टाकून बस जाळली.
रात्री साडेनऊ वाजता गेवराई आगाराची पुणे-गेवराई बस क्र. एम.एच. बी.एल. 2800 ही पुण्याहून गेवराईकडे येत असताना गेवराई-शेवगाव रस्त्यावर अज्ञात 50 ते 60 आंदोलकांनी बस अडवून बसवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. या प्रकरणी गेवराई शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या चार दिवसांपासून जरांगे पाटलांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळत आहे तर काही ठिकाणी आंदोलन हिंसक वळण घेत आहे. काल बीड जिल्हा कडकडीत बंद होता. त्यानंतर रात्री गेवराई आगाराच्या बस धावल्या. यामध्ये पुणे-गेवराई ही बस पुणे आगारातून निघली होती.
ती शेगाव मार्गे गेवराईकडे येत असताना रात्री साडेनऊच्या दरम्यान 50 ते 60 आंदोलनकर्ते धोंडराई फाटा येथे जमले होते. त्यांनी अचानक बस थांबवून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत बसवर दगडफेक केली. बाटली व बकेटमध्ये आणलेले पेट्रोल, डिझेल बसवर टाकून बस पेटवून दिली. यामध्ये 20 ते 25 लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी 50 ते 60 अनोळखी लोकांवर गेवराई पोलिसात कलम 143, 147, 148, 149, 427, 435 भा.दं.वि.सह कलम 4 सार्वजनिक मालमत्ता प्रतिबंधक अधिनियम-ानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बससेवा आजही विस्कळीत, फक्त पाच गाड्या सोडल्या
काल मराठा समाजाच्या आंदोलना समर्थनार्थ बीड जिल्हा बंद असल्याने महामंडळाने एसटी बस डेपोतून एकही गाडी बाहेर सोडलेली नव्हती तसेच इतर डेपोतूनही या गाड्या सोडण्यात आल्या नव्हत्या. आजही एसटी महामंडळाने दुपारपर्यंत एकही गाडी सोडली नव्हती मात्र दुपारी 12 नंतर बीड-पाटोदा दोन बसफेर्या, बीड-अंबाजोगाई एक फेरी, बीड-धारूर एक फेरी आणि बीड-नेकनूर एक फेरी अशा पाचच एसटी बस सोडण्यात आल्या होत्या.







