6 हजार ग्रामसेवक तर 5 हजार शिक्षक स्वागताच्या मानवी साखळीत
मंत्रिमंडळाच्या स्वागतासाठी मानवी साखळी तयार करण्यासाठी कर्मचार्यांचा उपयोग
बीड (रिपोर्टर): मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या पुर्वसंध्येला 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असून या बैठकीसाठी शासकीय कर्मचार्यांचा गैरवापर करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील 6 हजार ग्रामसेवकांपैकी 5 हजार ग्रामसेवक आणि 8 हजार प्राथमिक शिक्षकांपैकी किमान 6 हजार प्राथमिक शिक्षक यांनी औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित रहावयाचे असून त्यांनी औरंगाबाद येथील बाबा पेट्रोल पंप विभागीय आयुक्त कार्यालय या रस्त्यावर मुख्यमंत्र्यांसह येणार्या मंत्र्यांसाठी मानवी साखळी उभा करावयाची आहे.
औरंगाबाद या ठिकाणी कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने मराठवाडा विभागात 14, 15, 16 असे तीन दिवस भरगच्च कार्यक्रम होत असून 16 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी औरंगाबाद विभागातील मोठ्या संख्येने जनसमुदाय दिसावा याकरिता शासकीय यंत्रणेचा आणि कर्मचार्यांचा गैरवापर करण्यात येत असून बीड जिल्ह्यातील 6 हजार ग्रामसेवकांपैकी किमान 5 हजार ग्रामसेवक हे स्वखर्चाने औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित राहीले पाहिजे, असे आदेश गटविकास अधिकारी यांना दिलेले आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील आठ हजार प्राथमिक शिक्षकांपैकी किमान 6 हजार प्राथमिक शिक्षक हे औरंगाबाद या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहिले पाहिजे, असे आदेश गटशिक्षणाधिकार्यांना देण्यात आलेले आहेत. ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक आणि इतर कर्मचारी यांचा वापर मुख्यमंत्री आणि येणार्या मंत्र्यांसाठी बाबा पेट्रोल पंप, विभागीय आयुक्त कार्यालय ते सुभेदारी विश्रामगृहावर फक्त मानवी साखळी उभा करणे एवढाच या कर्मचार्यांना औरंगाबाद या ठिकाणी बोलवण्याचा उद्देश आहे. या दिवशी बीड जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळा बंद राहण्याची शक्यता आहेत.
मंत्रीमंडळ बैठकीत विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणार
बीड जिल्ह्यातील काही विकासाचे प्रस्ताव संबंधित शासकीय यंत्रणेने जिल्हाधिकार्यांमार्फत औरंगाबाद मंत्रिमंडळ बैठकीत मांडावयाचे आहेत. त्यात प्रामुख्याने बीड जिल्ह्यातील स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवन, व इतर शासकीय कामांचा समावेश आहे.
14, 15, 16 तारखेला दिवाबत्ती लावण्याची मोहीम
14, 15, 16 या दिवशी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी भवन, गावपातळी व इतर शासकीय कार्यालय आणि प्राथमिक शाळा या इमारतींमध्ये ग्रामसेवक आणि प्राथमिक शिक्षकांनी आपल्या स्वखर्चाने दिवाबत्ता लावून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करावयाचा आहे तर 17 तारखेला प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक फेरीसह झेंडावंदन होणार आहे.