बीड (रिपोर्टर)- गेल्या तीन वर्षांपुर्वी बीड नगरपालिकेकडे रस्त्यावरील धूळ जमा करण्याचे अद्यावत तीन मोठे यंत्र दाखल झाले मात्र ते यंत्र सध्या धूळखात पडून आहेत. त्यामुळे बीड शहरातील नागरिकांच्या नाका-तोंडात धूळ जाते. यामुळे फुफ्फुसाच्या आजाराचे रुग्ण बीडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
बीड शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते झाले, हे रस्ते करताना दर्जेदार साहित्य न वापरल्यामुळे एखादे वाहन सुसाट गेले तर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्यात बीड शहरातून मोठ्या प्रमाणात हायवा सुसाट वेगाने धावतात. यामुळे रस्त्यावर मोठी धूळ उडते. या धुळीचा बीडकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी बीड नगरपालिकाकडे अदद्यावत धूळ जमा करणारे तीन यंत्र दाखल झाले होते. तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मोेठा गाजवाजा करत आता या यंत्राद्वारे बीह शहरातील सर्व रस्त्यांवरील धूळ नियमीत साफ केली जाईल त्यामुळे बीड शहर धूळमुक्त होईल अशी घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात या मशीनचा एकदाही उपयोग केला की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेमक्या या मशीन कशामुळे बंद आहेत, त्या तात्काळ सुरू करून बीड शहरातील सिमेंट रस्त्यावरील सर्व धूळ साफ करावी, अशी मागणी बीडकरांमधून होत आहे.