एक मुलगी दगावली, चार डेंग्यूचे रुग्ण रुग्णालयात
बीड (रिपोर्टर)- धारूर तालुक्यातील कासारी बोडखा परिसरात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असून कासारी येथील अनन्या लहू बडे या मुलीचे डेंग्यूच्या आजाराने निधन झाले आहे तर या परिसरात आणखी चार डेंग्यूचे रुग्ण माजलगाव आणि बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
याबाबत अनेक वेळा येथील ग्रामपंचायतच्या सरपंचाने या परिसरामध्ये डेंग्यू आजाराची साथ पसरल्याचे भोगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकार्यांना लक्षात आणून दिलेले आहे. बीड येथीलही जिल्हा परिषद आरोग्य विभागाला याबाबत कळवून सुद्धा आरोग्य विभागाने या डेंग्यूच्या साथीबाबत गांभीर्याने घेतलेले नाही. कासारी येथेच अन्य चार रुग्णांना डेंग्यू आजाराची लागण झालेली आहे. काही रुग्ण तापीच्या आजाराने ग्रस्त आहेत. या चार रुग्णां व्यतिरिक्त वैद्यकीय अहवाल आल्यानंतर त्यांनाही डेंग्यूची लागण झाल्याचे निदान होईल. हे रुग्ण माजलगाव आणि बीड येथील खासगी रुग्णालांमध्ये उपचार घेत आहेत. ही बाब जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासोबतच भोगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य विभागाने गांभीर्याने घ्यावी, कासारी बोडखा गाव आणि परिसरामध्ये धूळ फवारणी करण्यात यावी, अशीही मागणी मोठ्या प्रमाणात या भागातून होत आहे. तर आरोग्य विभागाने कासारी येथे आरोग्य शिबीर लावावा, अशी मागणी होत आहे.