अग्रलेख-
पोरांनो, आयुष्याचा अन् कुटुंबाचा
मसनवाटा होऊ देऊ नका
गणेश सावंत
मो. नं. 9422742810
महाराष्ट्रातला मराठा एकवटलेला असताना मराठा समाजातीलच काही संधीसाधू खंडोजी खोपडे आंदोलनात खोट पाडण्याचा प्रयत्न करतायत, कोणी आम्ही 96 कुळी मराठे असल्याचा दावा करून कुणबी आणि मराठा वेगळा असल्याचे म्हणतात तेव्हाही स्वराज्याच्या लढाईत दिल्ली तक्ताचे पाईक खंडोजी खोपडेसारखे स्वराज्याला विरोध करतच होते आणि आताही 96 कुळीचा अभिमान बाळगणारे दिल्ली तक्ताचे पाईक आरक्षण लढ्यात खोडा घालतच आहेत.
धैर्य ठेवत, संघर्ष करत यशाची पताका फडकावणारी जमात आज आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत असल्याने तिच्यातलं धैर्य संपलय. संघर्ष करण्याची उमेद नाहीशी होतेय, त्यामुळे यशाचे पताके फडकावणे तर सोडा तो जमात आणि तो समाज आज संतप्त होत एकीकडे रस्त्यावर उतरत असला तरी दुसरीकडे आत्महत्यासारखा मार्ग स्वीकारत स्वत:च्या कर्तृत्ववान इतिहासाची अंजानपणे पायमल्ली करताना दिसून येत आहे. गेल्या 48 तासात मुंबई, बीड, नांदेड, हिंगोली या ठिकाणच्या मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या. चाळीस वर्षाच्या आरक्षणाच्या लढ्याचे धैर्य आणि चार दशके करत आलेला संघर्षाचे फलित शून्यच दिसून आल्याने आता नैराश्येतून मराठा समाजाचे तरुण आत्महत्यासारखा मार्ग स्वीकारू लागले आहेत. हे जेवढे चिंताजनक आहे तेवढेच संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राज्य करणार्या राज्यकर्त्यांना या आत्मत्यांचं सोयरसुतक आहे की नाही? जे राज्यकर्ते आरक्षणाचे आश्वासन देत आले आहेत त्यांना या आत्महत्या रोखता का आल्या नाहीत? सरळसरळ तरुण इशारे देत आहेत आणि त्या इशार्यांकडे दुर्लक्ष झाल्यानंतर ते आपलं उभं आयुष्य संपवून टाकतायत. तरीही राज्यकर्त्यांना पाझर फुटत नसेल तर धैर्य ठेवणारे, संयम बाळगणारे अन्य मराठे आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी पुढे कुठले पाऊल उचलतील हे सांगणे कठीण आहे. जेव्हा मराठ्यांचे पिन ड्रॉप सायलंट तेही लाखोंचे 56 महामोर्चे निघाले, त्या काळातही मराठ्यांच्या काही लेकरांनी आपले जीवन संपविले. हा अनुभव सरकार दरबारी असताना पुन्हा मराठा आरक्षणावरून राज्यात रान पेटल्यानंतर मराठा तरुणांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केली तेव्हा पहिल्याच आत्महत्येला, बलिदानाला
व्यर्थ न होवो बलिदान
म्हणत मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकारने भाष्य का केले नाही? मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून मनोज जरांगे हे आंदोलन करत आहेत. त्यांच्या पाठिशी महाराष्ट्रातला अवघा मराठा एकदिलाने उभा आहे. लाखाच्या नव्हे तर न भूतो न भविष्यती अशा सभा मनोज जरांगेंच्या होत आहेत. सभेला येणारे रमाठा समाजातले अबालवृद्ध, राजा-रंक एकाच लाईनीत म्हणा, अथवा रेषेत बसत आहेत. या सभा अथवा हे आंदोलने नक्कीच नियोजीत, आर्थिक व्यवहारातून उभे राहत नाहीत, तर या आंदोलनामागे त्या त्या समाजाची निकड असते. रमाठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे हे सांगणे जितके सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे तितकेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करत सत्ताकारणाची उब घेणे हे आजपर्यंतच्या सत्ताधार्यांचे आद्य कर्तव्य ठरले आहे, त्यामुळे कोण आत्महत्या करतय, कुणाच्या घरात खायला नाही, याच्याशी राज्यकर्त्यांना देणेघेणे नाही. आत्महत्यासारखी गंभीर समस्या समोर येत असताना शासन-प्रशासन व्यवस्था याकडे पुर्णत: दुर्लक्ष करत असल्याचा
पुरावा काल बीडमध्ये मिळाला
परवा जगन्नाथ काळकुटे नावाचा तरुण बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या एका लिंबाच्या झाडावर चढला, रात्रीचे नऊ ते दहा वाजले असतील, त्याने मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, म्हणून आपण आत्महत्या करणार आहोत, असे स्पष्ट सांगितले. त्यावेळी उपस्थित असलेल्या काहींनी गन्नाथ काळकुटे यांची विनवणी करत ‘तुम्ही खाली या अवघा मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करतोय, आत्महत्येने प्रश्न सुटणार नाही, ’ असं म्हणत त्याची समजूत काढली. त्यावेळी त्याठिकाणी पोलीस यंत्रणाही उपस्थित होती, पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले, त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले, मात्र विषय इथेच संपला नाही. प्रशासनाच्या मुख्य कार्यालयासमोर जेव्हा एखादा तरुण झाडावर चढून अपाण एखाद्या मागणीसाठी आत्महत्येसारखं एखादं पाऊल उचलतो, असे स्पष्टपणे सांगतो तेव्हा त्याची दखल शासनाबरोबर प्रशासनातील अधिकार्यांनी घ्यायला हवी होती मात्र ती घेण्यात आली नाही आणि सरशेवटी काल संध्याकाळी जगन्नाथ काळकुटे या तरुणाने आपल्या स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसापूर्वीच मुंबईच्या पुलावर जालना जिल्ह्यातील एका तरुणाने गळफास घेतला. त्याच्या खिशात सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत स्पष्टपणे उल्लेख दिसून आला. मराठा आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसू नका, अशी त्याची शेवटची इच्छाही त्यात पहायला मिळाली. इकडे नांदेडमध्येही एका विद्यार्थ्याने रात्री आत्महत्या केली, त्या विद्यार्थ्यानेही आपल्या सुसाईड नोटमध्ये आरक्षण हेच लक्ष्य ठेवल्याचे दिसून येते. मग आरक्षणासाठी मराठ्यांची पोरं मृत्यूशय्येवर जात असताना शासन-प्रशासन व्यवस्थेने स्वस्थ बसणं हे कशाचं लक्षण? परंतु मराठ्यांच्या पोरांनो, आरक्षण या विषयावर आत्महत्या हे उत्तर नक्कीच नाही, लढून मरणार्या अन् छातीवर वार झेलणार्या लढवय्या पुर्वजांचे तुम्ही वारसदार आहात. संकट कित्येक येतात, कित्येत जातात,
आठवा जिाऊंचं चरित्र
आम्ही सातत्याने म्हणतो, महाराष्ट्राच्या मातीत जो जन्मला तो मराठा आणि त्याच्या नशिबी कायम संघर्ष मात्र अंती विजयी चरित्र नक्कीच आहे. महाराष्ट्राच्या माणसाने संकटे आले म्हणून पळून जायचं नसतं, आत्महत्येचा मार्ग स्वीकारायचा नसतो तर धैर्य ठेवत संघर्ष करत यशाची पताका फडकावी लागते. जिजाऊ मॉ साहेबांनी जेव्हा स्वराज्याचे स्वप्न पाहिले तेव्हापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईपयर्ंत मॉ साहेबांवर किती संकटे आली असतील, त्यांना किती संघर्ष करावा लागला असेल, स्वत:च्या पोटचा गोळा स्वराज्यासाठी जेव्हा त्यांनी अर्पित केला तेव्हा स्वत:चं लेकरू छत्रपती शिवराय अनेक वेळा मृत्यूच्या दाढेत गेले. त्यावेळी जिजाऊ मॉ साहेबांना काय वाटत असेल, अफजल खान जेव्हा जावळीच्या खोर्यात आला, स्वराज्यावर तुटून पडला, उभ्या मावळात होत्याचे नव्हते केले अशा वेळी अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट होणार हे जेव्हा ठरलं आणि उद्या सकाळी महाराज अफजल खानाच्या भेटीला जाणार, ती रात्र जिजाऊंसाठी कशी असेल, एका बसणीला बोकड फस्त करणारा, लोखंडी पहार दमात वाकवणारा अफजलसमोर महाराज ते काय, तेव्हा जिजाऊ मॉ साहेबांना झोप आली असेल काय, तेव्हा तर झोपेच्या गोळ्या नव्हत्या, पेन किलरही नव्हती, मात्र स्वराज्य आणि सत्य त्यात स्वाभिमान हे नसा नसामध्ये भिणलेलं होतं. त्या स्वाभिमानासाठी जिजाऊंनी ज्या पद्धतीने आपला पोटचा गोळा शिवरायांना स्वराज्यासाठी अर्पण केलं, तसच आजही अनेक मातांनी आरक्षणाच्या लढ्यात पोरा हो तुम्हाला तुमच्या मातांनी रस्त्यावर उतरवलं आहे, तुमची एक चुक, आत्महत्यासारखी भूमिका तुमच्या आई-वडिलांना कुठे नेऊन ठेवील. मॉ साहेबांसह छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवा,
समाजातल्या खंडोजी
खोपड्यांकडे दुर्लक्ष करा
एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे यासाठी उभा महाराष्ट्रातला मराठा एकवटलेला असताना मराठा समाजातीलच काही संधीसाधू खंडोजी खोपडे आंदोलनात खोट पाडण्याचा प्रयत्न करतायत, कोणी आम्ही 96 कुळी मराठे असल्याचा दावा करून कुणबी आणि मराठा वेगळा असल्याचे म्हणतात तेव्हाही स्वराज्याच्या लढाईत दिल्ली तक्ताचे पाईक खंडोजी खोपडेसारखे स्वराज्याला विरोध करतच होते आणि आताही 96 कुळीचा अभिमान बाळगणारे दिल्ली तक्ताचे पाईक आरक्षण लढ्यात खोडा घालतच आहेत. रामदास कदमसारखे त्याला हवा देतायत. मराठा समाजातलेच अनेक नेते आरक्षणाच्या लढ्यात खंडोजी खोपडे होऊ पाहतायत. स्वराज्याच्या लढयामध्णयङे जसे खंडोजी खोपडे, रांझेगावचे पाटलं चौरंगा होऊन बसले, तसे या लोकांचेही खंडोजी खोपडे होणे निश्चित असल्याचे समाजातले लोक स्पष्टपणे बोलताना दिसतायत. विषय हा आहे, मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला, या लढ्याचे फायदे-तोटे पाहण्याइरादे पक्षा-पक्षाच्या पुढार्यांनी जे धोरण आखले आहे ते आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्यासाठी विजयाचे तोरण करण्या हेतुच. मात्र आजची लढाई ही तलवारीची नाही, रक्तपाताची नाही, कापाकापीची नाही, जीव द्यायचा आणि जीव घ्यायचा याची नाही, आजची लढाई ही लोकशाहीत शब्दाने, हक्काने, कायद्याने जिंकायची आहे. त्यामुळे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यात आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार दिला, त्या लोकशाही पद्धतीने आंदोलन करा, आत्महत्यासारखा मार्ग स्वीकारू नका, स्वत:च्या आयुष्याचा आणि कुटुंबाचा मसनवाटा होऊ देऊ नका.