सरपंचपदासाठी 161 अर्ज दाखल; भालगावच्या ग्रामस्थांनी घातला मतदानावर बहिष्कार; एकही अर्ज आला नाही
केज (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यासह राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुका घोषीत झाल्यानंतर त्या त्या ग्रा.पं.अंतर्गत निवडणुकीचं वातावरण चांगलच तापलं आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी केज तालुक्यात सरपंचपदासाठी 161 अर्ज आलेले आहेत. यातील किती उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात याकडे आता लक्ष लागून आहे. 25 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
केज तालुक्यातील 24 ग्रा.पं.साठी निवडणुका होत आहेत. सरपंचपदासाठी एकूण 161 अर्ज आलेले आहे तर सदस्यासाठी 786 अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे. ज्या ज्या ग्रा.पं. अंतर्गत निवडणुका होत आहेत त्या ठिकाणी निवडणुकीचं वातावरण चांगलच तापलं आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेनंतर खर्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. 24 ग्रा.पं.पैकी रामेश्वरवाडी येथील एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यात 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहे तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात भालगावच्या मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे. त्यामुळे या गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.