राज्यभरातून 73 स्थळांचा समावेश, पालकमंत्री धनंजय मुंडेंनी सुचवली होती नावे
बीड येथील खंडेश्वरी मंदिर, अंबाजोगाई तालुक्यातील मुकुंदराज मंदिर, खोलेश्वर मंदिर, मरळ सिद्धेश्वर बारव या स्थळांचा समावेश!
बीड (रिपोर्टर)- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या जन्मदिनानिमित्त नमो 11 सूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या अंतर्गत नमो तीर्थस्थळ सुधार अभियान- 73 महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या अभियानात राज्यातील 73 तीर्थस्थळांचा कायापालट करण्यात येणार असून यामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुचवलेल्या चार तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. (पान 7 वर)
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथील प्रसिद्ध खंडेश्वरी मंदिर, अंबाजोगाई तालुक्यातील मुकुंदराज समाधी मंदिर, खोलेश्वर मंदिर तसेच मरळ सिद्धेश्वर बारव या चार तीर्थस्थळांचा समावेश करण्याबाबत सुचवले होते. या चारही तिर्थस्थळांचा या योजनेतून कायापालट होणार आहे. नमो तीर्थ सुधार अभियानातून या चारही तिर्थस्थळांच्या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार, प्राथमिक भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, डिजिटल दर्शनाची सोय, परिसर सुशोभीकरण व स्वच्छता इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी पर्यटन विभाग विविध विकास योजनांमधून निधी उपलब्ध करून देणार आहे.