शिवसेनेत मोठं बंड झालं. आज पर्यंंतच्या बंडापेक्षा हे बंड सर्वात मोठं आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी हे सगळं घडवून आणलं. आपल्या सोबत काही आमदारांना घेवून ते गुजरातहून थेट गोवाहाटीत गेले. ज्या ठिकाणी शिंदे गेले, ती दोन्ही राज्य भाजपाच्या ताब्यात आहेत. आपल्याला धोका होवू नये म्हणुन त्यांनी हे स्थळ निवडलं म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली. बंडखोरांना भाजपाचं समर्थन आहे हे लपून राहिलं नाही. भाजपाने किती ही हात वर केले तरी बंडखोरामागे भाजपाची कुटनिती आहे. शिंदे यांचं हे नियोजन आजचं नसावं. शिंदे यांना 2019 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामुळेच, त्यामुळे शिंदे यांच्या मनात या दोन्ही पक्षाबद्दल नाराजी असावी. त्या नाराजीत भाजापाने हवा भरली. खा. शरद पवार यांनीच उध्दव ठाकरे यांना आग्रह केल्यामुळे ठाकरे मुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री झाले असते तर कदाचीत काँग्रेस, राष्ट्रवादीत तितकं सख्य राहिलं नसतं. त्यामुळेच पवारांनी ठाकरे यांच्या नावाला पसंदी दिली. आमच्या सोबत येण्याऐवजी शिवसेना दोन्ही काँग्रेस सोबत गेली याचा प्रचंड राग भाजपाला आहे. तोंडातला घास हिसकावून घेतल्याचे भाजपावाले नेहमीच बोलावून दाखवत होते. “मी पुन्हा येईल” हे फडणवीस याचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे फडणवीस बेचैन होते. भाजपाने आज पर्यंत शिवसेनेला जाणीव पुर्वक त्रास देण्याचं काम केलं. त्यांच्या मंत्र्याच्या आणि आमदारांच्या पाठीमागे ईडीचा भुंगा लावला. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असं ही भाजपावाले सांगत असतात. जे आज पर्यंत भाजपावाले बोलत होते. तेच आज एकनाथ शिंदे बोलू लागले, म्हणजे शिवसेना फोडण्याचं कारस्थान गेल्या काही महिन्यापासून शिजत होतं हे आता स्पष्ट झालं आहे.
बंडखोरांचा इतिहास
बंडखोरी ही राजकारणातील नवीन नाही. सगळ्यांच पक्षांना कमी, अधिक प्रमाणात बंडखोरीचा फटका बसलेला आहे. एकीकाळी बलाढ्य असलेल्या काँग्रेसमध्ये अनेक वेळा बंडखोरी झालेली आहे. खुद्द इंदिरा गांधी यांना त्याचा त्रास झालेला आहे. शिवसेना ही हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारी संघटना होती. या संघटनेचं पक्षात रुपांतर झालं. 1990 नंतर शिवसेनेने उभारी घेतली. मुंबई, ठाणे सारख्या शहरी भागात असणारी शिवसेना ग्रामीण भागात रुजली ती बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक शैलीमुळे. पुर्वी काँग्रेसचा सगळीकडे बोलबाला होता. काँग्रेस पक्षाने प्रस्थापीतांच्या हिताचं राजकारण केलं. त्यामुळे सर्वसामान्यांना राजकारणात तितका वाव नव्हता. शिवसेनेने अगदी तळागळातील कार्यकर्त्यांना मोठं केलं. पद दिले. विशेष करुन आमदार, खासदारकीचं तिकीट देवून त्यांना निवडून सुध्दा आणलं. त्यामुळे शिवसेना पक्ष वाढत गेला. शिवसेना वाढत असतांना छगन भुजबळ यांनी बंड केलं, हे शिवसेनेतील पहिलं बंड होतं. त्यानंतर नारायण राणे, राज ठाकरे, यांचे देखील बंड झाले. ज्यांनी, ज्यांनी बंड केले, ते आज समोरच आहेत. बंडखोर तितके यशस्वी झालेले नाहीत. बंडखोरीने शिवसेना थांबली नाही ती वाढत राहिली. शिवसेना आज सत्तेत आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद सेनेकडे आहे. तीन्ही पक्षांची अशीच आघाडी राहिली तर आपलं काय होईल याची धास्ती भाजपावाल्यांना वाटली असावी, म्हणुनच हा बंडखोरी नाट्याचा प्रयोग घडवला?
बंडखोरांना काळजी
बंडखोर एकनाथ शिंदे यांनी आपण कशामुळे बंड केलं याची माहिती दिली. हिंदुत्वाला शिवसेनेेने मुरड घातल्याचा आरोप शिंदे यांचा आहे. िंहंदुत्वाची काळजी घेणारा भाजपा असतांना शिंदे यांना िंंहंदुत्वाची काळजी वाटते म्हणजे आश्चर्यच म्हणावं लागेल. यापुर्वी कधी शिंदे यांनी हिंदुत्वाची भाषा केली नाही. 2014 साली भाजपा सोबत शिवसेनेने पाच वर्ष संसार केलेला आहे. पाच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांचे नेहमीच खटके उडत होेते. त्यावेळी शिंदे यांना कधी हिंदुत्वाची जाण झाली नाही. शिंदे यांच्याकडे महत्वाचं नगरविकास खातं होतं. या खात्यात त्यांनी भरीव कामगिरी केल्याचं कुठे दिसत नाही. भाजपासोबत असतांना शिंदे यांनी भाजपाच्या नेत्यांना कंटाळून आपला राजीनामा पक्षप्रमुखाकडे दिला होता. त्यावेळी त्यांना कशाची जाणीव झाली होती? भाजपासोबत नकोच म्हणुन शिवसेनेच्या काही आमदारांचा तगादा असायचा. आज अचानक बंडखोरांना कशाचा साक्षात्कार झाला? बंडखोरापैकी दादा भुसे, अब्दुल सत्तार यांच्यासह काही मंत्री आहेत. दादा भुसे यांच्याकडे महत्वाचं राज्याचं कृषी खातं असतांना त्यांना आपलं खातं चांगलं करावं असं वाटलं नाही. शेतकर्यांना न्याय देण्याचा किती प्रमाणीक प्रयत्न भुसे यांनी अडीच वर्षात केला. शेतकर्यांच्या आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. आज शेतकरी पेरणीत आहे. काही कंपन्या, व्यापारी शेतकर्यांची लुट करतात. शेतकर्यांची काळजी करण्याऐवजी भुसे गोवाहाटीत ‘मस्त आराम’ करतात. असा कृषी मंत्री असल्यावर काय दिवे लागतील? शिवसेनेने काँग्रेसमधून आलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्री केले, ते ही बंडखोरांच्या टोळीत आहेत. सत्तार यांना ही हिंदुत्वाची काळजी वाटू लागली? बंडखोर जे काही कारणं सांगतात ते निव्वळ एक ढोंग आहे. या ढोंगावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही. राजकारण किती खालच्या पातळीचं आणि दर्जाहीन असू शकतं हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
फोडाफोडी
सहजा, सहजी काही गोष्टी मिळत नसतील तर त्या जबरीने मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात. अशांची इतिहास कधी नोंद घेत नाही. उलट त्यांच्या पाठीमागे बदनामीचे डाग लागतात. आज लोकशाहीत आकडयांचा खेळ आहे. ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ त्यांची सत्ता असते. बहुमत हे नौतिकतेतून मिळवता येत नाही का? दुसर्यांची घरे फोडून आपल्या संपत्तीत वाढ करणं यात कसलं शौर्य आहे. स्वत:च्या हिंमतीवर, कष्ट करुन संपत्तीत वाढ करणं यात खरा शौर्यपणा असतो. जी राज्य आपली नाहीत, त्या राज्यात काही ना काही कारस्थानं करुन ती राज्य उध्दवस्त करुन त्या ठिकाणी आपलं नवीन सरकार स्थापन करण्याची अचाट मोहिम भाजपाने हाती घेतली. मध्यप्रदेश, कर्नाटक येथील काँग्रेसचं सरकार भाजपावाल्यांनी पाडून त्याठिकाणी आपलं सरकार स्थापन केलं. पश्चिम बंगाल ताब्यात घेण्यासाठी भाजपाने काय, काय नाही केलं. ममता सारखी ‘वाघिण’ भाजपाला घाबरली नाही. ममता यांनी भाजपाला जशास तसे उत्तर देवून आपलं राज्य शाबूत ठेवलं. ममता घाबरल्या असत्या तर आज त्यांच्या ताब्यातून बंगाल गेलं असतं. बिहारचे नितीश कुमार आज भाजपा सोबत आहेत. उद्या त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेवू द्या, त्यांच्या पाठीमागे किती चौकशा लागतात? आपल्या सोबत न राहणार्या प्रादेशीक पक्षाच्या नेत्यांना चौकशीच्या फैर्यात अडकवले जावू लागले. काहींनी चौकशीच्या भीतीपोटी भाजपात जाण्याची वाट धरलेली आहे. शिंदे यांच्या सोबत असलेल्या काहींना ईडीची नोटीस आलेली आहे. या नोटीशीची भीतीच त्यांना इथपर्यंत घेवून आली की काय?
नेमकं काय होणार?
बंडखोरांनी बंडखोरी केली. त्यातून काय निपन्न होणार हे येत्या काळात दिसेल. बंडखोरांना बंडखोरी करायची होती तर त्यांनी आपण ज्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आलो आहोत. त्या पदाचा राजीनामा देवून पुन्हा नव्या दमाने निवडणुकीला सामोरे जायला हवे होते, पण तसं झालं नाही. त्यांना राज्याचं सरकार खाली पाडायचं आहे. त्यातून त्यांना आनंद घ्यायचा आहे. राजीनामे देवून आपण सर्वच निवडून येणार नाहीत, याचा विचार बंडखोरांनी केलाच असेल, त्यामुळे राजीनामे दिले नाहीत. ज्यांनी, ज्यांनी पक्षाशी बेईमानी केली, ते पुन्हा निवडून आले नाहीत, अपवाद एक, दोन वगळता. बंडखोरीमुळे शिवसेना अडचणीत सापडली. स्वत: उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असतांना हे सगळं झाल्याने ही मोठी नामुष्कीची बाब आहे. पक्ष चालवतांना काही गोष्टीकडे पक्षप्रमुखांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे सगळं झालं. शिवसेनेचा बराच कारभार एकनाथ शिंदे हेच पाहत होते. पक्ष प्रवेशापासून ते काही निर्णय घेण्या पर्यंत, निधीच्या बाबतीत दुजाभाव होत होता असं सांगितलं जात असलं तरी त्यात काही तथ्य वाटत नाही. निधी सगळीकडे सारखाच येत असतो. आपल्यात कर्तृत्व करण्याची धमक असली की, सगळं काही व्यवस्थीत होत असतं. ज्यांना काहीच कराचयं नाही, ते सतत तक्रारीचा पाढा वाचत असतात. सध्या राज्यात बंडखोरांच्या विरोधात रान पेटलेलं आहे. बंडखोरांचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देण्याच्या प्रक्रियेत दिसून येवू लागलं. राज्याचं वातावरण ढवळून निघालं. ज्यांनी, ज्यांनी बंड केलं. त्यांच्या मतदार संघात इतरांना संधी मिळणार म्हणुन नवीन कार्यकर्ते नक्कीच जोशाने काम करतील. शिंदे यांचं समर्थन करणारे कार्यकर्ते भरपूर असले तरी त्याचं भवितव्य काय?
उद्या आपल्या घरात हेच होवू नये?
शिवसेनेच्या बंडाळीमुळे भाजपाला गुदगुदल्या होत आहे. दुसर्यांची घरे फोडण्यात भाजपाला आसुरी आनंद वाटू लागला. आजच्या भाजपात जे लोक आहेत, ते नवे आहेत. ज्यांनी, ज्यांनी भाजपा वाढवली, त्यांना सध्याच्या भाजपात तितकं स्थान राहिलेलं नाही. नवख्या भाजपावाल्यांनी पक्ष हायजॅक केला. केंद्रात कुणी मोदी, शहा यांच्या विरोधात बोलू शकत नाही. त्यांच्या विरोधात कुणी बोललं तर त्याचा ‘कार्यक्रम’ झाल्याशिवाय राहत नाही. तशीच अवस्था राज्याची आहे. फडणवीस यांच्या विरोधात कुणी बोललं तर ते ‘काट्याने काटा’ काढतात. आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांना त्यांनी वाळीत टाकल्यासारखं केलं आहे. पंकजा मुंडे ह्या धडाडीच्या नेत्या आहेत. त्यांना जाणीवपुर्वक टाळण्याचं काम फडणवीस हे करत आले. बाहेरुन आलेल्या नेत्यांना भाजपात चांगलं स्थान मिळतं आणि भाजपाच्या निष्ठावंत नेत्यांना चांगलं स्थान मिळत नाही ही दुर्देवाची बाब नाही का? एकनाथ खडसे पक्ष सोडून गेले, ते केवळ पक्षात सन्मान मिळत नाही म्हणुनच गेले. पंकजा मुंडे यांनी अनेक वेळा आपली नाराजी व्यक्त केलेली आहे, तरी पक्षाने त्यांची दखल घेतली नाही. शिवसेनेचे बंडखोर भाजपाला जावून मिळाले तर भाजपा थोडचं मागे हाटणार? सत्ता स्थापनेचा दावा होऊ शकतो. भाजपा सत्तेसाठी उतावीळ झालेला पक्ष आहे. त्यातली त्यात फडणवीस यांना सत्तेशिवाय करमेना झालं आहे. बंड झाल्यापासून भाजपाच्या बैंठकावर बैंठका होत आहे. बंडखोरांना केंद्रातील सरकार संरक्षण देतं म्हणजे बंडाचा रिमोटचं भाजपाच्या जवळ आहे हे सिध्द होतं? बंडखोरांना भाजपाने जवळ केलं तर आधीच भाजपात मोठी गर्दी झालेली आहेत, त्यात पुन्हा ह्यांची भरती झाली तर अनेक मतदार संघात याचे वेगळे दुष्परिणाम नक्कीच दिसून येतील. पुर्वीचे भाजपा कार्यकर्ते आणि सध्याचे बंडखोर यांच्यात समन्वय साधणं अवघड होणार आहे. आज भाजपाने शिवसेनेचं घर फोडण्यासाठी बंडखोरांना मदत केली. उद्या अशाच पध्दतीची बंडाळी भाजपात झाली तर नवल वाटायला नको? आजचं शिंदे याचं बंड हे विचारपुर्वक घडवून आणलेलं आहे. आपल्याला जो पक्ष जड होत आहे. त्याची पाळेमुळे उध्दवस्त करण्याचं काम भाजपा करु लागला. आजची ही लढाई अवघड आहे. या लढाईत प्रादेशीक पक्षांनी हार मानली तर त्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. प्रादेशीक पक्षांनी जशास तसं च्या भुमिकेत राहिले तरच ते जिवंत राहू शकतात, नसता त्याना भाजपा संपवल्याशिवाय राहणार नाही.