आष्टी (रिपोर्टर): शिर्डी येथून तुळजापूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जावून आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह गाडीचा चालक जागीच ठार झाला. कारच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने सदरचा अपघात झाला असावा, असा कयास काढला जात आहे. या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून सदरचा अपघात अहमदनगर-बीड महामार्गावरील आष्टी तालुक्यात असलेल्या पोखरीजवळ आज सकाळी 11 वा.च्या दरम्यान घडला. यातील जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक असे की, इंगोले परिवार शिर्डी येथून तुळजापूरला देवदर्शनासाठी आज सकाळी स्विफ्ट कार क्र. एम.एच. 03 बी.सी. 6736 यामध्ये बसून निघाले होते. कारमध्ये इंगोले परिवारातील चौघांसह चालक प्रवास करत होता. त्यांची कार अहमदनगर-बीड महामार्गावरील आष्टी तालुक्यात असलेल्या पोखरीजवळ आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या जांभळीच्या झाडावर जावून ही भरधाव कार आदळली. कारचा वेग अधिक असल्याने कारचा समोरच्या बाजुने अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात अनिता राहुल इंगोले (वय 33 वर्षे) व चालक रुपेश बबन भेंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुप राहुल इंगोले व अभय राहुल इंगोले हे दोघे जखमी असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरचा अपघात हा आज सकाळी 11 वा.च्या सुमारास घडला. अपघात घडल्यानंतर पोखरी येथील आणि अपघास्थळाच्या परिसरातील नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेत गाडीमध्ये असलेल्या सर्व लोकांना गाडीतून बाहेर काढले. या घटनेची माहिती आष्टी पोलिसांना झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पो.कॉ. काळे, बब्रुवान वाणी, पोलीस चालक कन्हेरे यांनी घटनास्थळी जावून मदत केली.
0000