बीड (रिपोर्टर): गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये पाऊस व गारपीट झाल्याने हजारो हेक्टर शेती बाधीत झाल्याचे सांगण्यात येत असून रब्बीतील कापूस, कांदा, द्राक्षे, केळी, मोसंबी, दाळींब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यासह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची वस्तूनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून ज्या ठिकाणी शेतकर्यांचे नुकसान झाले आहे तेथे मदत करण्यासाठी शेतकर्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका शासनाची असल्याचे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक्सद्वारे म्हटले आहे.
सोशल मिडियाच्या एक्स हँडलवर व्यक्त होताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, गेल्या दोन दिवसांच्या कालखंडामध्ये राज्यात 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याचे वृत्त आहे. तसेच आणखी पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या अवकाळी व गारपीटीने रब्बीतील कापूस, कांदा, द्राक्षे, केळी, मोसंबी, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यासह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले आहे. कृषी व मदत पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या वतीने झालेला पाऊस व त्यामुळे झालेले नुकसान याची वस्तूनिष्ठ माहिती संकलीत करण्याचे काम सुरू आहे. जिथे शेतकर्यांचे नुकसान झाले असेल तिते मदत करण्यासाठी शेतकर्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची शासनाची भूमिका आहे.











