बीड (रिपोर्टर): शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात एकच गोंधळ उडाला. खांडे यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जाऊ लागलाय. त्यात काल रात्री साडे बारा ते एकच्या सुमारास कुंडलिक खांडे यांना बीडच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बीड-अहमदनगर रस्त्यावरील जामखेड या ठिकाणी ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात गेल्या चार महिन्यापूर्वी कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. खांडेंच्या अटकेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे खांडे गेली चार महिने उघडपणे सर्वत्र फिरताना दिसून येत होते. दस्तुरखुद्द जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या उपस्थितीतही ते अनेक ठिकाणी पहायला मिळत होते.
लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पहिल्यांदा पंकजा मुंडेंना धोका दिला. स्वत:च्या गावातून लीड दिली मात्र अन्य सातशे पेक्षा अधिक बुथची यंत्रणा पंकजांचे प्रतिस्पर्धी बजरंग सोनवणेंना दिली. एवढेच नव्हे तर निवडणुकीमध्ये सोनवणेंना पैसेही पुरवले. यासह कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याबाबतचा संवाद असलेला ऑडीओही परवा व्हायरल झाला आणि जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली. पंकजा मुंडे समर्थकांनी संतप्त होत सोशल मिडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर याच प्रकरणी काल बीड आणि परळीमध्ये खांडेंवर गुन्हा दाखल झाला. मात्र रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुंडलिक खांडे यांच्या विरोधात गेल्या चार महिन्यांपूर्वी दाखल असलेल्या कलम 307 अंतर्गत जामखेड येथून त्यांना अटक करण्यात आले. चार महिन्यांपासून कुंडलिक खांडे सर्वत्र फिरताना दिसून येत होते. नेत्यांच्या व्यासपीठावर, सभांमध्ये एवढेच नव्हे तर जिल्हा पोलीस अधिक्षकांसोबतही ते अनेक वेळा पहायला मिळाले. मात्र ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुंडलिक खांडेंना बीड पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर खांडेंना पेठ बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.