बीड (रिपोर्टर): राजकारणासह समाजकारणामध्ये संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्याला राज्यात आणखी एक मानाचं पद मिळालं आहे. वक्फ बोर्डाचे सदस्य म्हणून काम करत राहिलेले समीर काझी यांच्यावर आता वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. आज वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदाची नेमणूक करण्यात आली त्यावेळी ही बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर बीड जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा होत असून बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाच्या पदाचा तुरा रोवला गेला.
अल्पसंख्यांक विकास विभाग महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या निवडणूक घेण्यासाठी प्राधिकृत अधिकारी, प्रधान सचिव डॉ. रिचा बागला यांनी समीर काझी यांना वक्फ बोर्डाचे अध्यक्ष म्हणून आज बिनविरोध निवडून दिल्याबाबतचे प्रमाणपत्र दिले. राज्य पातळीवर हे एक मोठे पद आहे. या पदासाठी आमदार, खासदारांसह मंत्री मोठी ताकद लावून असतात. मात्र महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची ही जबाबदारी समीर काझी यांच्यावर सोपविण्यात आली. समीर काझी यांनी वक्फ बोर्डाच्या सदस्यपदावर काम करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लोकहिताचे आणि वक्फ बोर्डाच्या हिताचे काम केले. राजकारणासह समाजकारणामध्ये बीड जिल्हा हा सातत्याने आघाडीवर असतो. आज पुन्हा एकदा महत्वाचं पद बीड जिल्ह्याकडे आलं आहे. समीर काझी यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर बीड जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा
वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाचे महत्व अनन्साधारण आहे. देशभरात पसरलेल्या वक्फ बोर्डाच्या कामासाठी अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असतो. ते पद बीड येथील समीर काझी यांना मिळालं आहे. त्यामुळे आजमितीला बीड जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळाल्यासारखं आहे.