बीड (रिपोर्टर) संत जनीजनार्दन यांचे तेरावे वंशज आणि थोरले पाटांगणाचे मठाधिपती धुंडीराज देविदास बुवा पाटांगणकर महाराज यांचे काल सायंकाळच्यादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 82 वर्ष होते. त्यांच्या पार्थिवदेहावर आज सकाळी अमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रासह व्यापारी, पत्रकार आदिंची उपस्थिती होती.
बीड शहरातील पाटांगण गल्लीतील संत जनीजनार्दन संस्थानचे मठाधिपती धुंडीराज देविदास बुवा पाटांगणकर हे जिल्हा परिषदेचे शिक्षक होते. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. 1968 मध्ये संत जनीजनार्दन संस्थानचे मठाधिपती म्हणून ते काम पाहू लागले. किर्तन, प्रवचन, धर्मशास्त्र, पंचांगाच्या माध्यमातून त्यांनी संस्थानचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी राज्यभर शिष्य जोडले. वेदावर प्रभुत्व असलेल्या धुंडीराजशास्त्री पाटांगणकर हे आयुर्वेदातील औषधे देत होते. त्यामुळे त्यांनी बीडमध्ये तळागळातील सामान्य माणूस आपल्याशी जोडला होता. बीड शहरात यज्ञ यागाबरोबरच प्रत्येक धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. मागील तीन दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बीडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थिवदेहावर शहरातील अमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, पत्रकार सह आदि नागरीकांची उपस्थिती होती.