पेठ बीडमध्ये गुन्हेगारी वाढली, पोलिसांनी बघ्याची भूमिका
नशेडी सर्व सामान्यांच्या घरात घुसू लागले
बीड, (रिपोर्टर)ः- पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघू लागले असून अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या भागामध्ये असतांनाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जात नाही. विशेष करून नशा करणार्या लोकांमुळे सर्व सामान्य नागरीक त्रस्त झाले. नशेखोरांबाबत तक्रारी असतांनाही पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेवू लागले आहेत. ठाण्याला पोलीस निरिक्षक म्हणुन मोदीराज आल्यापासुन गुन्हेगारांनी अधिकच धुमाकूळ घालणे सुरू केले. एका महिलेच्या घरामध्ये घुसून नशेखोरांनी घरातील सहित्याची नासधूस करत दहशत निर्माण केली. याबाबत पोलीसांनी संबंधिताविरोधात कठोर कारवाई केली नसल्याने महिलेने जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली.
पेठ बीड भागातल्या अचानक नगर येथील रूबीन जावेद पठाण या महिलेच्या घराच्या पाठीमागे शेख अफ्तर शेख रशिद यांची रूम आहे. त्या रूमवर त्याचे मित्र मुख्तार सय्यद, शेख सादेक, शेख उमर हे नशेच्या गोळ्या, नशेची पावडर, दारू, गांजा विक्री करत आहेत. तसेच ते स्वतःही त्याचे सेवन करतात. त्यामुळे त्या ठिकाणी नशेखोरांची नेहमीच गर्दी असते. याबाबत पेठ बीड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. मात्र पोलीसांनी त्यावर कोणतीच कारवाई केली नाही. दरम्यान एकेदिवशी मुख्तार सय्यद व सादेक शेख याने शेख रूबीना यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्यास त्यांनी धमकी दिली. याबाबत महिलेने पेठ बीड पोलीसांत तक्रार दाखल केली. पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेस दबाव टाकण्यात येत आहे. तसेच महिलेस शिवीगाळ करून मारहाण करत दगडफेक करून घरातील साहित्याची तोडफोड करत दहशत निर्माण केली. याबाबत पेठ बीड पोलिसांनी ठोस भुमिका घेतली नसल्याने रूबीना पठाण यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली. पेठ बीड परिसरातील अनेक भागात नशेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे. अशा नशे खोरांच्या विरोधात कारवाई केली जात नाही. पोलिसही बघ्याची भूमिका घेवू लागले. मोदीराज आल्यापासुन गुन्हेगारांनी डोके वर काढले. गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे. नशा करणारे कोणालाही त्रास देवू लागले, कोणालाही अडवून पैसे मागितले जावू लागले, कधी कधी लुटमार ही होवू लागली तरी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी याची दखल घेत संबंधिताविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.