बीड (रिपोर्टर): दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस पडू लागला. रात्री तालुक्यात संततधार पाऊस पडला. आज सकाळीही पाऊस झाला असून या पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच बिंदुसरा नदीला पाणी आलं. रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील दहा मंडलात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मराठवाड्यामध्ये अजूनही कमीच पाऊस आहे. मराठवाड्यातील धरणे 70 ते 80 टक्के कोरडे आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. रात्री अनेक ठिकाणी धो धो पाऊस पडला. यात जिल्ह्यातील दहा मंडलामध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये बीड 70.0, पाली 75.3, नाळवंडी 75.8, लिंबागणेश 74.8, पाटोदा 78.5, उमापूर 75.8, नित्रूड 67.5, बनसारोळा 67.3, परळी 65.3 आणि कवडगाव 65.0 या दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. बीड जिल्ह्यात दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे धरणात पाणी जमा झाले नाही. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच रात्रीच्या पावसाने बिंदुसरा नदीला पाणी आले होते.